प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : आषाढ पौर्णिमेच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून व्यास पौर्णिमा अर्थात गुरु पौर्णिमा आयडियल स्मार्ट स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भावपूर्ण ‘गुरुवंदना’ सादर करून सर्व शिक्षकांना वंदन केले. शिक्षकांचे पाद्यपूजन करून त्यांना टिळा लावण्यात आला तसेच पुष्प अर्पण करून विद्यार्थ्यांनी गुरुजनांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे संपूर्ण शाळेत गुरुमहात्म्याचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ममता भोकरे मॅडम आणि समन्वयक श्री. विश्वास पाटील सर यांची विशेष उपस्थिती होती. मुख्याध्यापिका सौ. ममता भोकरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “गुरु हा अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा असतो. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे पहिले गुरु असतात. त्यांचा आदर करणे हेच खरे गुरुपूजन आहे.”समन्वयक श्री. विश्वास पाटील सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रामाणिकपणा, शिस्त आणि सातत्य राखावे तसेच गुरुजनांप्रती सदैव आदरभाव ठेवावा, असा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. अनुजा ढोणे मॅडम यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गुरुमहिमा, प्रार्थना, गीत तसेच लघुनाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व समजले. गुरुजनांप्रती कृतज्ञता व आदराची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणारा हा उपक्रम सर्वांसाठी आनंददायी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या