प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:अपघातजन्य परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी तातडीने आणि योग्य उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. सुसज्ज आयसीयू आणि अस्थिरोग विभागाची एकत्रित सुविधा उपलब्ध असल्याने तासगावचे लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अपघातग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरत असून, या रुग्णालयाने आपल्या आरोग्यसेवेच्या माध्यमातून रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे, असे प्रतिपादन सहसंचालक आरोग्य खरेदी, मुंबई तथा उपसंचालक आरोग्य, कोल्हापूर डॉ. दिलीप माने यांनी केले.
लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विविध आरोग्य शिबिरांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. माने म्हणाले, अपघातग्रस्त रुग्णांच्या उपचारामध्ये ‘गोल्डन अवर्स’ अत्यंत महत्त्वाचे असतात.अशा वेळी सुसज्ज आयसीयू आणि ऑर्थोपेडिक विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. तासगाव तालुक्यात ही गरज लाईफकेअर हॉस्पिटलने मोठ्या प्रमाणात पूर्ण केली आहे.त्यामुळे अनेक अपघातग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक केले.शासकीय आणि खासगी आरोग्य व्यवस्थेने समन्वयाने काम केल्यास आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होईल, असेही डॉ.माने यांनी नमूद केले.
*विविध आरोग्य उपक्रमांचा शुभारंभ*
वर्धापनदिनानिमित्त मोफत वयोवंदना व आयुष्मान भारत कार्ड काढण्याची पंधरवडाभराची मोहीम, मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर तसेच डॉ.अजित पाटील यांच्या ‘चला मित्रहो... आरोग्यावर बोलू काही’ या व्याख्यानमालेचा शुभारंभ डॉ. दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्व आरोग्य उपक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
*निरोगी राहण्यासाठी आहार, विहार आणि व्यायाम महत्त्वाचा*
‘चला मित्रहो... आरोग्यावर बोलू काही’ या व्याख्यानात डॉ. अजित पाटील यांनी निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. ‘लोकांनी आजारी पडू नये यासाठी व्याख्यान आयोजित करणारे लाईफकेअर हॉस्पिटल हे एकमेव असेल,’ असे त्यांनी सांगितले.
निरोगी आयुष्यासाठी आहार,विहार आणि व्यायाम या तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आहारामध्ये साखर, मैदा, मीठ आणि खाद्यतेलाचे प्रमाण कमी करून हिरव्या पालेभाज्या तसेच मोड आलेल्या कडधान्यांचा वापर वाढवावा. वाढत्या वयातील मुलांनी तसेच विशेषतः महिलांनी फास्ट फूडचे प्रमाण कमी करून संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
*मान्यवरांचा सत्कार*
सहसंचालक आरोग्य खरेदी या पदावर बढती मिळाल्याबद्दल डॉ.दिलीप माने व सौ. मनीषा माने यांचा डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर व डॉ. सौ.जयश्री शिवणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच ‘लाईफकेअर जीवन गौरव’ पुरस्कार प्राप्त डॉ. शब्बीर मुलानी व डॉ. शहाजी शेळके यांचा सपत्नीक सत्कार हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आला.हॉस्पिटलच्या गुणवंत कर्मचाऱ्यांचाही विविध बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी नगराध्यक्षा सौ. विजयाताई पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बिभीषण सारंगकर, जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे, डॉ. वंदना मेंढेकर, डॉ. सुधाकर अलमद, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. इंद्रजीत बागल, डॉ. सुहास कदम, डॉ. जहीर नदाफ, डॉ. मिलिंद जाधव, श्री. प्रताप घाडगे, डॉ. संतोष पाटील, डॉ. धनश्री माने, भाग्यश्री जाधव, डॉ. संदेश पाटील, डॉ. लीना पाटील, डॉ. हर्ष देशमुख, श्रद्धा खराडे, संजय तुपे, वैभव खोत, काजल शिंदे, प्रियांका अमृतसागर, वैशाली पवार, संजना रोकडे, वैभव पाटील आदी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर यांनी केले, तर आभार डॉ. विजय माने यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या