प्रतिष्ठा न्यूज | किरण कुंभार
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील बेदाणा सौद्यादरम्यान नियमांचे उल्लंघन करून बेदाण्याची उधळण केल्याचा आरोप करत संबंधित व्यापारी विनीत बाफना यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हा संघटक अमोल काळे यांनी केली आहे.संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई न झाल्यास सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काळे यांनी दिला आहे.यासंदर्भात अमोल काळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना पत्र दिले आहे.बेदाणा सौद्या दरम्यान नियमबाह्य पद्धतीने बेदाणा उधळला जात असल्याचा प्रकार यापूर्वीही बाजार समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या प्रश्नावर दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मनसेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले होते.त्यावेळी बाजार समिती प्रशासनातील पदाधिकाऱ्यांसह तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी बेदाणा उधळण रोखण्यासाठी आणि सौद्यादरम्यान नियमांचे पालन सुनिश्चित करण्याबाबत आश्वासन देत लेखी पत्र दिल्याचा दावा अमोल काळे यांनी केला आहे.मात्र, आश्वासनानंतरही बेदाणा सौद्यांमधील कथित गैरप्रकार थांबले नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.दि.२४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बेदाणा सौद्यादरम्यान व्यापारी विनीत बाफना यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करून बेदाण्याची बेसुमार उधळण करण्यात आल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. या घटनेनंतर संबंधित व्यापाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. बाजार समिती प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावीअशी मागणी त्यांनी केली आहे.
### ‘शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले’; प्रशासनावर काळेंचा आरोप
संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई न झाल्याबद्दल अमोल काळे यांनी बाजार समिती प्रशासन, संचालक मंडळ आणि सभापती यांच्यावरही नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासन व संबंधित पदाधिकारी व्यापाऱ्याच्या बाजूने उभे असल्याचे दिसून येत असून, शेतकऱ्याला मात्र वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे.बेदाणा सौद्यांमध्ये पारदर्शकता, नियमांचे पालन आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य व्यवहार मिळणे आवश्यक असल्याचे सांगत काळे यांनी संबंधित व्यापाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यास दि. २८ सप्टेंबर रोजी बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा मनसेने दिला आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या