प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर :भाजपने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले असूनही, पुन्हा पक्षात प्रवेश मिळावा यासाठी बसवनगौडा पाटील प्रयत्न करत आहेत, हिंमत असेल तर ‘जेसीबी’ पक्ष स्थापन करून निवडणूक लढवावी. किती जागा मिळतात आणि अनामत रक्कम जप्त होते की नाही, हे पाहू. ‘जेसीबी’ पक्षाकडून यत्नाळ कुठूनही निवडणूक लढले, तरी त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढवू,असे आव्हान कर्नाटक सेंद्रिय बियाणे प्रमाणन संस्थेचे माजी अध्यक्ष विजुगौड पाटील यांनी दिले.आपल्यावरील आरोपांना पत्रकार परिषदेत उत्तर देताना विजुगौड पाटील यांनी यत्नाळ यांच्यावर जोरदार टीका केली. यत्नाळ यांनी बबलेश्वर मतदारसंघात एम.बी. पाटील आणि आपण संगनमत केल्याचा आरोप केला आहे. हा आरोप त्यांनी सिद्ध करावा. आपल्याला ८० हजार मते मिळाली असून कार्यकर्त्यांनी स्वतःचा पैसा खर्च करून निवडणूक लढवली असल्याचे विजुगौड यांनी सांगितले.मागील निवडणुकीत यत्नाळ यांनी आपल्या बबलेश्वर मतदारसंघात येऊ नये, अशी विनंती आपण पक्षाच्या हायकमांडकडे केली होती. मात्र, तरीही ते दोन ठिकाणी प्रचारासाठी आले आणि ‘सिंचन कोणी केले, त्यांना मतदान करा’ असे आवाहन केले. आपण भाजपला मतदान करा, असे यत्नाळ यांनी सांगितल्याचे सिद्ध करून दाखवावे, असे विजुगौड म्हणाले.
‘अटलबिहारी वाजपेयींच्या चपलेलाही यत्नाळ पात्र नाहीत’
‘एम.बी. पाटलांनी पोसलेला पोपट’
‘एम.बी. पाटील यांनी तुम्हाला पोसले असून तुम्ही त्यांचा पोपट आहात,’ अशी टीका विजुगौड यांनी केली. हिंमत असेल तर बबलेश्वरला येऊन एम.बी. पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवा. मी विजयपूरला येऊन तुमच्याविरोधात निवडणूक लढवतो. एम.बी. पाटील ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतील, तेथेही तुम्ही निवडणूक लढवून पाहा, असे आव्हान त्यांनी दिले.
मागील विधान परिषद निवडणुकीत आपण चूक केली. यत्नाळ यांच्या भावाने विनंती केल्यामुळे त्यांना मतदान केले होते. रेल्वे मंत्री असताना तुम्ही काय केले? शहराच्या विकासासाठी काय केले? याचा हिशेब द्यावा. यडियुरप्पा आणि बोम्मई यांनी निधी दिल्यामुळे शहराचा विकास झाला, असेही विजुगौड म्हणाले.
आरोप सिद्ध करा, शपथ घ्या’
एम.बी. पाटील यांच्याशी संगनमत केल्याचा किंवा त्यांची भेट घेतल्याचा आरोप सिद्ध करावा.यासाठी अरकेरी गुड्ड किंवा सिद्धेश्वर मंदिरात येऊन शपथ घ्यावी.दोन दिवसांत अरकेरी गुड्ड येथे येऊन शपथ घेण्याचे आव्हान त्यांनी दिले.आपल्या विरोधात केलेल्या आरोपांबाबत यत्नाळ यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचेही विजुगौड यांनी सांगितले.
‘मुस्लिमांबद्दल अशी वक्तव्ये का?’
‘टोपी घातलेले आणि बुरखा घातलेले लोक माझ्यासोबत येऊ नयेत,’ असे वक्तव्य करणाऱ्या यत्नाळांवरही विजुगौड यांनी प्रश्न उपस्थित केला.दिवसा मुस्लिमांवर टीका करणे आणि रात्री त्यांच्या घरी जेवण करतात. यत्नाळ यांच्याबाबत आपल्याकडे अनेक कागदपत्रे असून आगामी काळात ती स्क्रीनवर दाखवावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी, परशुराम राजपूत, रमेश हदनूर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या