प्रतिष्ठा न्यूज
बुधगाव/प्रतिनिधी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला आज, १७ सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. राजवाड चौक परिसरात स्वच्छता करून तसेच साचलेला कचरा उठाव करून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
महात्मा गांधी जयंती अर्थात २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. गावातील स्वच्छता उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर ग्रामपंचायतीचा भर राहणार आहे.
या अभियानात बुधगावमधील युवक-युवती, राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी व शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका तसेच ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
अभियानाच्या कालावधीत बुधगावमधील प्रमुख चौक, शाळा, अंगणवाड्या, शासकीय व निमशासकीय कार्यालय परिसर, समाजमंदिरे तसेच मंदिर परिसर याठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, कचरा नियमितपणे उचलणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, यावर विशेष भर दिला जाणार आहे.
लोकनियुक्त सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच अविनाश शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून हे अभियान राबविण्यात येत आहे.
‘स्वच्छ बुधगाव, सुंदर बुधगाव’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. गावात अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी आणि ग्रामपंचायतीच्या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या