प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते.निर्णयक्षमता वाढविण्यासह नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळते.समाजासाठी केलेल्या कामातून मिळणारा आनंद आणि ऊर्जा जीवनाला सकारात्मक दिशा देते.त्यामुळे युवकांनी आधुनिक युगात आदर्श नागरिक म्हणून ठसा उमटविण्यासाठी प्रयत्न करावेत राष्ट्र उभारणीत सक्षम युवकांची भूमिका महत्त्वाची आहे,सक्षम युवक घडविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करते असे प्रतिपादन प्रा. एम. डी. पाटील, अध्यक्ष तासगाव तालुका ग्राहक मंच यांनी केले.
ते पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय,तासगाव येथे राष्ट्रीय सेवा दिनानिमित्त ‘राष्ट्र उभारणीमधील युवकांची भूमिका’ या विषयावरील आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश एस.पाटील होते.प्रा.एम.डी.पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेत व्यक्तिमत्त्व घडविण्याची मोठी ताकद आहे.समतोल आयुष्य जगण्यासाठी तसेच निर्णयक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये युवकांना नेतृत्व घडविण्याची आणि कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते. निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव, वृक्षारोपण यांसारख्या विविध उपक्रमांतून समाजाभिमुख काम करण्याची संधी स्वयंसेवकांना मिळते. नेतृत्वगुण भक्कम करण्याबरोबरच जीवन जगण्याचे सार राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळते.
प्राचार्य डॉ. सुरेश एस. पाटील म्हणाले, आदर्श नागरिक घडविण्यासाठी युवकांमध्ये संशोधनवृत्ती आणि सामाजिक भान निर्माण झाले पाहिजे. सुज्ञ नागरिक घडविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली आहे. जलसंधारण, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांबाबत समाजात जनजागृती करण्याचे काम या माध्यमातून होते. ग्रामीण जीवनाची ओळख होते तसेच युवकांना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळते. युवकांनी नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचारांची जपणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले.यां कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम अधिकारी डॉ. तातोबा बदामे यांनी करून दिला.यावेळी डॉ. शहाजी पाटील, डॉ. जीवन घोडके, कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय थोरबोले, डॉ. डी. बी. गुंजाळ, प्रा. जे. एच. लावंड,डॉ.नितीन गायकवाड यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ. श्रुती परचुरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सविता कोळेकर यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या