सांगली प्रतिनिधी : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. विस्तारीत टेंभू योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहचेल, यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी दिली.
टंचाईचे संकट गडद होत असताना खासदार पाटील ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. त्यांनी आधी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. आता सिंचन योजनांच्या आढाव्यासाठी ते दौऱ्यावर आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी टेंभू टप्पा क्रमांक सहामधील घाटमाथ्यावरील पळशी, घाटनांद्रे, तिसंगी, गरजेवाडी, जरंडी, कुल्लापूर, वाघोली, शेळकेवाडी, केरेवाडी, जाखापूर या भागाचा दौरा त्यांनी केला. विस्तारीत टेंभू योजनेचा कार्यकारी अभियंता यादव यांच्यासह महसूल, पाणीपुरवठा, महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीत बैठक झाली. सहाव्या टप्प्यातील नकाशा समजून घेताना त्यांनी शेतकऱ्यांकडून सूचना मागवल्या.
विस्तारीत योजना लाभ क्षेत्रातील अडचणी, नैसर्गिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती याचा अभ्यास करून त्यावर उपाय करण्याबाबत चर्चा झाली. पळशी येथील सिद्धनाथ मंदिर भागातील क्षेत्रासस पुरेसे पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. घाटनांद्रे येथे पळशी उपसा सिंचन योजनेचे काम लवकर पूर्ण करून वंचित भागास पाणी देण्याचा आग्रह लोकांनी धरला. जरंडी येथील बैठकीत शेतकऱ्यांनी गाव तलावात पाणी सोडण्याची मागणी केली. तिसंगी येथे टेंभू योजनेतून तिसंगी लघू वितरिकेस विस्तारित गोरेवाडी कालव्याचे कनेक्शन करण्याची मागणी केली. गाव पाणीपुरवठा तलावास पाणी देण्यासाठी मोठे पाईपलाईन करण्याची मागणी करण्यात आली. गरजेवाडी हद्दीतील ओढ्यास शेळकेवाडी रस्त्या जवळील पवनचक्की ऑफिसपासून फिडर लाईन देणे आणि जाकापूर हद्दीतील गट क्रमांक १८० मधील तलावास पाणी देण्यासाठी अतिरिक्त फिडर पाईपलाईन करण्याची मागणी केली.
कुंडलापूर येथील बैठकीत जाकापूर हद्दीतील गट क्रमांक १८० मधील तलावास पाणी देण्यासाठी अतिरिक्त फिडर पाईपलाईन करण्याची मागणी करण्यात आली. विस्तारित योजनेचा कुंडलापूर हद्दीतील लाभक्षेत्राचा नकाशा समजून घेण्याची मागणी केली. वाघोलीत मूळ टेंभूमध्ये समावेश असलेल्या व वाघोली गावातील शेतकऱ्यास लाभ मिळणाऱ्या तिसंगी लघु वितरिकेस विस्तारित गोरेवाडी कालव्याचे कनेक्शन करण्याची मागणी केली. शेळकेवाडी येथे विस्तारित टेंभू योजनेवरील शेळकेवाडीच्या लाभ क्षेत्राचा नकाशा समजून घेण्याची मागणी केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या