प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने निकष क्रमांक एक अर्थात पहिला ट्रिगर लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज, जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, तासगाव तालुक्यातील पर्जन्यमानाची प्रत्यक्ष परिस्थिती आणि तांत्रिक आकडेवारी यामध्ये तफावत असल्याने तासगावचा दुसऱ्या ट्रिगरमध्ये दुष्काळी तालुका म्हणून समावेश व्हावा, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली.तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील कवठेमहांकाळ तालुक्याचा पहिल्या ट्रिगरमध्ये दुष्काळी तालुका म्हणून समावेश झाला आहे. मात्र, तासगाव तालुक्यातही पावसाचे असमान वितरण, काही भागांमध्ये अपेक्षित पर्जन्यमान न होणे आणि त्याचा शेतीवर झालेला परिणाम यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे तांत्रिक निकषांबरोबरच तालुक्यातील प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून तासगावचा दुसऱ्या ट्रिगरमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात येत आहे.तासगाव तालुक्याचे अर्थचक्र मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असून द्राक्ष, ऊस, भाजीपाला आणि अन्य पिकांवर पावसाच्या लहरीपणाचा थेट परिणाम होतो. तालुक्यातील सर्वच भागांमध्ये पावसाचे प्रमाण एकसमान नसल्याने केवळ सरासरी पर्जन्यमानाच्या आकडेवारीवरून संपूर्ण तालुक्याची परिस्थिती निश्चित करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका आमदार रोहित पाटील यांनी घेतली आहे.
तासगाव तालुक्यातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी यांची वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे. दुष्काळी निकषांच्या दुसऱ्या ट्रिगरमध्ये तासगावचा समावेश करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा सुरू असून, तालुक्याला दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
पहिल्या ट्रिगरमध्ये जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश झाला असताना तासगावचा समावेश न झाल्याने आता दुसऱ्या ट्रिगरकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. शासनाच्या निकषांमध्ये बसणारी तांत्रिक बाब तसेच प्रत्यक्ष पर्जन्यमानाची वस्तुस्थिती यांचा समन्वय साधून तासगावचा दुष्काळी यादीत समावेश होतो का, याकडे शेतकरी आणि ग्रामीण भागाचे लक्ष आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या