प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : गणेशोत्सवाचे औचित्य साधत महिला बेघर निवारा केंद्र, मिरज येथे सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवून आणण्यात आला. स्वातीताई खाडे यांच्या नेतृत्वाखाली “एक पेड गणेशजी के नाम” हा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमातून गणेशभक्तीबरोबरच वृक्षसंवर्धन, सामाजिक सेवा आणि गरजू महिलांप्रती संवेदनशीलता जपण्याचा संदेश देण्यात आला.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधी आणि उत्सवापुरता मर्यादित न राहता समाजहित, पर्यावरण संरक्षण आणि मानवतेची जाणीव निर्माण करणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने निवारा केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वृक्ष हेच भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा, सावली आणि सुरक्षित पर्यावरणाचे आधारस्तंभ आहेत, असा संदेशही देण्यात आला.
यावेळी स्वातीताई खाडे यांनी महिला बेघर निवारा केंद्रातील महिला लाभार्थींशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, आरोग्यविषयक समस्या, रोजगाराच्या संधी, निवासाची परिस्थिती तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे की नाही, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. महिलांनी मांडलेल्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून घेत त्यांना आवश्यक ती मदत, मार्गदर्शन आणि सहकार्य लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
समाजातील वंचित आणि गरजू घटकांना आधार देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. सण-उत्सवांच्या माध्यमातून आनंद वाटण्याबरोबरच गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सेवा, संवेदना आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
या उपक्रमासाठी संस्थेच्या कार्यवाह सुरेखा शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे वृक्षारोपणासोबतच महिला लाभार्थींच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधता आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील आणि महिला लाभार्थींनी स्वागत केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या