प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:“माझे नोकरीचे काम होत नाही, लग्न जमत नाही, पैसे मिळत नाहीत, घरात त्रास आहे, पती नांदवून घेत नाही, मुलं होत नाहीत, शेजारी किंवा भावकी त्रास देते...” अशा वैयक्तिक अडचणींवर तोडगा काढण्याच्या नावाखाली तासगाव शहरातील विविध भागांत पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे कथित ‘दरबार’ भरवले जात असल्याची चर्चा असून,या प्रकाराला आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अमावस्या,पौर्णिमा तसेच रविवारी अशा ठराविक दिवशी काही ठिकाणी लोकांना एकत्र करून त्यांच्या वैयक्तिक समस्या ऐकून घेण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.अडचणीत असलेल्या नागरिकांच्या असहाय्यतेचा फायदा घेत मंत्र-तंत्र, बाधा,करणी अथवा अन्य अंधश्रद्धाजन्य उपायांच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे दावे केले जात असल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे,या प्रकाराला केवळ अशिक्षित किंवा ग्रामीण भागातील नागरिकच बळी पडत नसून सुशिक्षित,बेरोजगार आणि विविध कौटुंबिक समस्यांनी त्रस्त असलेले नागरिकही आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ श्रद्धेचा विषय न राहता फसवणूक आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकांच्या अडचणींचे निराकरण करण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार होत असतील किंवा भीती निर्माण करून नागरिकांची दिशाभूल केली जात असेल, तर अशा प्रकारांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून अंधश्रद्धा पसरविणे, नागरिकांची फसवणूक अथवा कायद्याचे उल्लंघन होत आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच आळा न घातल्यास असहाय्य नागरिकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रशासनाने केवळ तक्रारीची वाट न पाहता अशा कथित दरबारांची चौकशी करून दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या