प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) समाजातील नागरिकांना मूलभूत अधिकार, शासकीय ओळखपत्रे, विविध प्रमाणपत्रे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. तासगाव तालुक्यातील सावळज येथील रामोशी वस्ती मळा येथे उद्या रविवार, दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी हे अभियान होणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महसूल विभागाच्या निर्देशानुसार, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.अभियानांतर्गत वस्तीनिहाय लाभार्थ्यांची नावे निश्चित करून विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवास व अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र आणि आयुष्मान भारत कार्ड आदी कागदपत्रांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.महसूल विभागाच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ‘जिवंत ७/१२’ मोहिमेंतर्गत फेरफार घेणे, विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज भरून घेणे व मार्गदर्शन, अॅग्रास्टॅक नोंदणी तसेच महसूलविषयक बाबींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ७/१२ दुरुस्ती, पीएम किसान योजना आणि सीलिंग जमीन वर्ग-२ संदर्भातील प्रस्तावांसाठीही मार्गदर्शन केले जाणार आहे.याशिवाय श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान योजना यांसह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
तासगाव तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांनी या विशेष अभियानाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या