प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 27 : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयातील निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्यात घेण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालतीत शेतकऱ्यांच्या रस्त्याचे प्रलंबित प्रश्न आपापसात मिटवून ९ तडजोडीतून १२२ शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला.या महसूल लोकअदालतीत एकूण ६२ रस्त्यांच्या प्रकरणे सुनावणी व तडजोडीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९ रस्ता प्रकरणामध्ये अर्जदार आणि जाबदार यांनी आपापसात सामंजस्याने तडजोडनामा सादर केला. यामुळे दिलेल्या तडजोडनाम्यामुळे ही प्रकरणे निकाली काढणे शक्य झाले असून, या ९ तडजोडींमुळे तालुक्यातील एकूण १२२ शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.
या लोक अदालतीस ३२० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपले दावे मिटवण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, आटपाडी तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी व संबंधित विधिज्ञांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच निवासी नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे, निवडणूक नायब तहसीलदार प्रकाश सगर आणि महसूल नायब तहसीलदार दत्तात्रय दीक्षित यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि समन्वयामुळे शेतकऱ्यांचे रस्ता प्रश्न सहजासहजी सुटण्यास मोठी मदत झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या