विजयपूर : उत्तर कर्नाटकातील लोक बंगळुरूत जाऊन स्थायिक होतात, आमदारही बंगळुरूत येऊन राहतात आणि काही आमदार दुसरा विवाह करून तेथेच राहतात, या मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या वक्तव्यावर इंडीचे आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी एकपत्नीव्रती असून श्रीरामचंद्र आणि माझ्या वडिलांच्या आदर्शानुसार जीवन जगलो आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विजयपूर शहरात पत्रकारांशी बोलताना यशवंतरायगौडा पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री कोणत्या संदर्भातून आणि कोणत्या दृष्टिकोनातून हे वक्तव्य केले, हे त्यांनाच विचारावे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार काही जणांनी दुसरा विवाह केला असेल; मात्र आपण त्या वर्गात येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले
स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी योग्य नाही
काही जणांकडून स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी केली जात आहे. मात्र, ही मागणी योग्य नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्यातील सर्व भागांचा समान आणि संतुलित विकास करून सयुंक्त कर्नाटकाची संकल्पना अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
*तेलंगणाला पाणी देण्याबाबत मानवतेचा दृष्टिकोन*
कर्नाटकातून तेलंगणाला पाणी सोडण्याच्या मागणीबाबतही त्यांनी भूमिका मांडताना सांगितले कि, देशातील अनेक भागांप्रमाणेच कर्नाटकातही दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तर शेजारी राज्यांनी बंधुभावाने आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे, असे पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात पाणीटंचाई निर्माण झाली होती, त्यावेळी भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी आपण आंदोलन केले होते. त्याचप्रमाणे एखाद्या अन्य राज्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्यास मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र तेलंगणाकडून पाणी पिण्यासाठी मागितले जात आहे की शेतीसाठी, याबाबत आपल्याला सविस्तर माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या