विजयपूर : जनता दल (सेक्युलर) अर्थात जेडीएसच्या विजयपूर जिल्हा प्रधान कार्यदर्शी तथा जिल्हा प्रवक्तेपदी ज्येष्ठ पक्षनेते एस. एस. खाद्रीइनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा जेडीएस अध्यक्ष मल्लिकार्जुन यंडिगेरी यांनी नियुक्ती आदेश जारी केला असून, आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.
पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, पक्षाची तत्त्वे व विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्षाचे संघटन प्रभावी करण्याची जबाबदारी खाद्रीइनामदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
एस. एस. खाद्रीइनामदार यांना 37 वर्षांचा राजकीय अनुभव असून त्यांनी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 1992 मध्ये जिल्हा विद्यार्थी जनता दलाचे उपाध्यक्ष, 1994 मध्ये जिल्हा युवा जनता दलाचे संघटन कार्यदर्शी, 1997 मध्ये जिल्हा अल्पसंख्याक घटकाचे अध्यक्ष, 1998 मध्ये राज्य अल्पसंख्याक घटकाचे उपाध्यक्ष आणि 2000 मध्ये राज्य अल्पसंख्याक घटकाचे प्रधान कार्यदर्शी म्हणून त्यांनी काम केले आहे.
तसेच 2008 ते 2022 या कालावधीत त्यांनी विजयपूर जिल्हा कन्नड साहित्य परिषदेचे जिल्हा गौरव कार्यदर्शी म्हणून सेवा बजावली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील जेडीएस संघटनेला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या