गगनबावडा : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढा तीव्र झालेला असतानाच, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील सांगशी गावात एक अत्यंत संतापजनक व गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. 'युवक मराठा महासंघ' सांगशी शाखेचे प्रमुख व शाखा संघटक तुकाराम हैबती पडवळ यांच्या राहत्या घरासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता असलेला भगवा ध्वज अज्ञातांनी फाडून फेकून दिला, तसेच त्यांच्या घरालगतची बाजूची भिंत पाडून मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून गावातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे.
समाजात तेढ निर्माण करण्याचा डाव?
गणेशोत्सवाच्या काळात ही निंदनीय घटना घडली असून, तुकाराम पडवळ व त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास व असुरक्षिततेच्या छायेत जगावे लागत आहे. पडवळ हे मराठा समाजाच्या विविध आंदोलनांत सक्रिय असून, यापूर्वीही त्यांना अशा प्रकारचा मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजात राजकीय वा वैयक्तिक मतभेदांचा फायदा घेऊन अंतर्गत गटबाजी आणि वैमनस्य पसरवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी दाट शंका आता उपस्थित केली जात आहे.
पडवळ यांचे जिल्हास्तरीय नेत्यांना पत्र
या गंभीर घटनेची दखल घेत तुकाराम पडवळ यांनी जिल्हास्तरीय मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना निवदेन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की:
"मराठा समाजातील तरुण, विद्यार्थी व भावी पिढीच्या भवितव्यासाठी समाजाने आपापसातील राजकीय व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून ऐक्य राखणे गरजेचे आहे. परंतु, माझ्या घरावरील भगवा ध्वज फाडणे आणि मालमत्तेची तोडफोड करणे हे समाजहिताचे नाही. अन्यायाविरुद्ध सत्य समोर यावे आणि गावातील शांतता टिकून राहावी हीच माझी भूमिका आहे. चौकशीत गुन्हा सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार मी राखून ठेवत आहे."
कायदेशीर कारवाईचा इशारा; समाजाचे लक्ष लागून
सदर प्रकरणी निष्पक्ष सामाजिक चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तुकाराम पडवळ यांनी केली आहे. एखाद्या पदाधिकाऱ्याच्या घरासमोरील भगवा ध्वज फाडून भिंत पाडण्यापर्यंत खोडसाळ प्रवृत्तींची मजल गेल्यामुळे मराठा समाजातील ज्येष्ठ नेते व पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या