सांगली प्रतिनिधी : प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य कावड यात्रा सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेनुसार काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या ४० पवित्र नद्यांचे तसेच २१ गडकोटांचे पवित्र जल सांगलीत आणण्यात आले होते. या जलाचे विधिवत पूजन शिवतीर्थ, मारुती चौक येथे करण्यात आले. त्यानंतर हे पवित्र जल तसेच कृष्णा नदीचे जल कावडीतून खांद्यावर घेऊन हजारो शिवभक्तांनी हरिपूर येथील संगमेश्वर मंदिराकडे प्रस्थान केले. तेथे संगमेश्वरास जल अर्पण करून जलाभिषेक करण्यात आला.
कावड यात्रेच्या प्रारंभस्थळी शिवतीर्थ मारुती चौक येथे विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक वातावरण निर्माण करण्यात आले होते. केरळ अझिमला येथील शिवमूर्तीची तब्बल ४० फूट उंच भव्य प्रतिमा उभारण्यात आली होती. त्याचबरोबर यंदा केदारनाथ शिवलिंगाची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली होती. या प्रतिकृती आणि भव्य शिवमूर्तीने शिवभक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
कावड यात्रेच्या प्रारंभी मैनाक घोष, जिल्हा संघचालक सुधीरजी चापोरकर, जिल्हा संघ कार्यवाह नितीनजी देशमाने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर कावड यात्रेला उत्साहात सुरुवात झाली.
यावेळी २१ शंखांचा एकाच वेळी झालेला शंखनाद तसेच हलगी पथकाच्या पारंपरिक वादनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगवे ध्वज, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले होते. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते.
पारंपरिक वाद्यांचा वापर कौतुकास्पद
यावेळी जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी उपस्थित शिवभक्तांना संबोधित केले. ४० पवित्र नद्यांचे आणि २१ गडकोटांचे जल सांगलीत आणून त्याचे पूजन करण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. तसेच केदारनाथ शिवलिंगाची प्रतिकृती साकारल्याबद्दलही त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
विशेषतः कावड यात्रेत डॉल्बी आणि डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांना दिलेले महत्त्व कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. आगामी गणेशोत्सवातही नागरिकांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून उत्सवाची संस्कृती आणि परंपरा जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
कावड यात्रेच्या निमित्ताने सांगली शहरात शिवभक्ती, धार्मिक श्रद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी जोडलेले वातावरण निर्माण झाले होते. पवित्र जल कावडीतून घेऊन हरिपूर संगमेश्वरास अर्पण करण्याच्या या परंपरेत हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या वेळी सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्त संजीता मोहोपात्रा, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, DYSP अजय कोकाटे, जिल्हा संघचालक सुधीरजी चापोरकर, जिल्हा संघ कार्यवाह नितीनजी देशमाने, शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, सांगली ग्रामीण पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
तसेच पद्माकर जगदाळे, मोहन वनखंडे, श्री व सौ. महेंद्रभाऊ चंडाळे, डॉ. मनिषाताई पुणेकर, शंभूराज काटकर, शालिवाहन दादा शिंदे-म्हैसाळकर, अभिजीत हारगे, श्री व सौ. उदय बेलवलकर, श्री व सौ. संदीप कुकडे, भारतीताई दिगडे, डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, मनोहर सारडा काकाजी, अभिजीत पाटील यांच्यासह हजारो शिवभक्त माता-भगिनी, युवक आणि लहान मुले सहभागी झाले होते.
परंपरा, श्रद्धा आणि शिवभक्तीचा संगम घडविणाऱ्या या कावड यात्रेमुळे सांगली शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या