सांगली प्रतिनिधी | दि. १ : स्मार्ट मीटरच्या नावाखाली वीज ग्राहकांवर सक्ती लादण्याचा प्रयत्न केल्यास तो कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. सरकारने हुकूमशाही पद्धतीने स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न केल्यास ‘हाण की बडीव’ भूमिका घेऊन संबंधितांना झोडपून काढू, असा आक्रमक इशारा जयहिंद सेनेचे अध्यक्ष तथा स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीचे निमंत्रक चंदनदादा चव्हाण यांनी दिला. स्मार्ट मीटरची सक्ती थांबवून जुने मीटर कायम ठेवावेत, अन्यथा आंदोलनाची धग महाराष्ट्रभर पोहोचवू, असा इशाराही त्यांनी दिला.
चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या सहभागातून ‘स्मार्ट मीटर हटाओ’ जिल्हाव्यापी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने वीज ग्राहक सहभागी झाले होते. त्यामुळे महावितरणच्या स्मार्ट मीटर धोरणाविरोधातील संताप रस्त्यावर उतरल्याचे चित्र सांगलीत पाहायला मिळाले.
विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. घोषणांनी परिसर दणाणून सोडत मोर्चेकरी महावितरणच्या कार्यालयाकडे रवाना झाले. स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा, वीज ग्राहकांना लुटणे थांबवा, जुने मीटर कायम ठेवा, वीज दर कमी करा, अशा मागण्यांनी मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
महावितरण कार्यालयासमोर झालेल्या सभेत चंदनदादा चव्हाण यांनी सरकार आणि महावितरणच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला.
ते म्हणाले, “स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करून राज्य सरकार वीज ग्राहकांच्या खिशावर मोठा दरोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्राहकांच्या हिताचा विचार न करता हुकूमशाही पद्धतीने निर्णय लादण्याचा प्रयत्न केला, तर वीज ग्राहक हा निर्णय उधळून लावतील. स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. सरकारने तातडीने आपल्या भूमिकेत बदल करावा.”
महाराष्ट्रातील वीज दराचा मुद्दा उपस्थित करत चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरले. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर अधिक असल्याचा दावा करत वीज दर कमी करून तो सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आणावा, अशी मागणी त्यांनी केली.
“पूर्वीच्या वीज मीटरबाबत ग्राहकांच्या मोठ्या तक्रारी नव्हत्या. तरीही ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याचा घाट घातला जात आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिले वाढत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. ही ग्राहकांच्या खिशावरची थेट लूट असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने थांबवावी आणि जुने मीटर कायम ठेवावेत,” अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने ग्राहकांच्या भावना गांभीर्याने घेतल्या नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देताना चंदनदादा चव्हाण म्हणाले, “जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कडाडून विरोध करू. सक्तीने मीटर बसविण्याचा घाट घातल्यास ‘हाण की बडीव’ भूमिका घेऊन संबंधितांना झोडपून काढले जाईल. आंदोलन केवळ सांगलीपुरते मर्यादित राहणार नाही. महाराष्ट्रभर आंदोलनाची व्याप्ती वाढवून सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडू.”
दरम्यान, मोर्चातील वक्त्यांनीही सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. तोहिद मुजावर, माजी नगरसेवक शकील सय्यद, युनुस महात, माजी नगरसेविका शेवंता वाघमारे आणि सिंह आर्मीचे जैलाब शेख यांनी आपल्या भाषणातून स्मार्ट मीटरच्या सक्तीला तीव्र विरोध दर्शविला.
महावितरणसमोर संतापाचा उद्रेक
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून गेल्या काही काळापासून वीज ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वाढीव वीज बिलांची भीती, मीटर बसविण्याची सक्ती आणि ग्राहकांच्या संमतीचा प्रश्न यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असल्याचा दावा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर सांगलीत काढण्यात आलेल्या मोर्चातून वीज ग्राहकांचा रोष महावितरण प्रशासनासमोर मांडण्यात आला.
मोर्चामुळे विश्रामबाग परिसरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध संघटनांचे झेंडे, फलक आणि घोषणांनी परिसर गजबजून गेला होता. सरकारने स्मार्ट मीटरबाबत फेरविचार न केल्यास आगामी काळात आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार कृती समितीने व्यक्त केला.
स्वागत व प्रास्ताविक नितीन मिरजकर यांनी केले, तर आभार जयहिंद सेनेचे युवा प्रमुख रणजित चव्हाण यांनी मानले.
यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, डॉ. मन्नान शेख, विशालसिंग राजपूत, नईम शेख, फिरोज पठाण, डॉ. अब्दुल मन्नान शेख, रणजीत चव्हाण, नितीन मिरजकर, डॉ. संजय पाटील, डॉ. जयपाल चौगुले, सलीम पन्हाळकर, प्रा. तोहिद मुजावर, दत्ता पाटील, प्रा. प्रमोद इनामदार, महेश मासाळ, सतीश फोंडे, विजय बल्लारी, भगवानदास केंगार, सीमा सुरेंद्र गायकवाड, संगीता जाधव, आशुतोष धोतरे, प्रणव पाटील, अरुण रुपनर, गोरख व्हनखंडे, रविंद्र काळोखे, राहुल माने, गणेश चौधरी, राजशेखर पाटील, संतोष चौगुले, टिपू इनामदार, राजकुमार मगदूम, सुभाष पाटील, हुसेन शेख, इरफान मुल्ला, आयुब पटेल यांच्यासह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.
“सक्ती थांबवा, अन्यथा आंदोलन राज्यभर पेटवू!”
स्मार्ट मीटरच्या सक्तीचा निर्णय मागे घेऊन ग्राहकांना दिलासा न दिल्यास आगामी काळात सांगलीसह महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरचा मुद्दा आता केवळ वीज बिलापुरता न राहता सरकार विरुद्ध वीज ग्राहक असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या