प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 26 : खरीप हंगाम 2026 मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या चार तालुक्यांचा समावेश आहे. याबाबतचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला असून, या चारही तालुक्यांसह राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळी उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. खरीप 2026 हंगामातील परिस्थितीच्या आधारे कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. जूनपासून आतापर्यंतच्या पर्जन्यमानातील तूट तसेच अन्य घटकांचा विचार करून या तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश
सांगली जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या चार तालुक्यांची Trigger-1 लागू झालेल्या तालुक्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे. या चार तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने पंचनाम्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सांगितले. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने लागू केलेल्या उपाययोजनांची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येईल. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिण्याचे पाणी, चारा, जलसंधारणाची कामे आणि रोजगाराच्या संधी याबाबत संबंधित यंत्रणांनी संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करण्याची दक्षता घेण्यात येत आहे. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे व जीपीएस कोऑडिनेट संकलित करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
या सवलती लागू
सांगली जिल्ह्यातील या चार तालुक्यांसह राज्यातील 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पुढील उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, शेतीवर अवलंबून शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी व्यवस्था, जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे, पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचे नियोजन करणे या 12 उपाययोजना करण्यात येणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या