प्रतिष्ठा न्यूज / दिपक शिंत्रे
विजयपूर : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना सक्षम करून त्यांना स्वावलंबी बनविण्यात सौहार्द व सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष श्रीहर्षगौड पाटील यांनी सांगितले.विजयपूर येथील हुतात्मा चौकाजवळ वेदांत केसरी सौहार्द सहकारी संघाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
श्रीहर्षगौड पाटील म्हणाले, वेदांत केसरी म्हणून श्री मल्लिकार्जुन महास्वामीजी ओळखले जात होते. सहस्रमान संत श्री सिद्धेश्वर स्वामीजी आपल्या गुरूंचे नाव ऐकताच अत्यंत आनंदित होत असत. त्यांच्या मनात गुरूंबद्दल अपार भक्ती होती. अशा महान गुरूंच्या नावाने सौहार्द सहकारी संघ सुरू होत असल्याचा आनंद आहे. या संस्थेने उत्तरोत्तर प्रगती करावी, अशी शुभेच्छा त्यांनी दिली.
मुख्य अतिथी डीवायएसपी व लेखक बसवराज यलिगार म्हणाले, सहकारी व सौहार्द संस्थांसाठी विश्वास हाच जीवनाधार आहे. संचालक मंडळाने जनतेचा विश्वास संपादन केला तर संस्था निश्चितच उच्च स्तरावर पोहोचू शकते. वेदांत केसरी सौहार्द सहकारी संघाचे विश्वस्त मंडळ व संचालक प्रामाणिकपणा आणि जनसेवेला जीवनाचे ध्येय मानून कार्य करीत आहेत. त्यामुळे ही संस्था भविष्यात शताब्दी महोत्सव साजरा करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकार संघाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कवटगी म्हणाले, विजयपूर शहरात 700 हून अधिक सौहार्द सहकारी संस्थांची नोंदणी झाली आहे. मात्र, त्यापैकी सुमारे 300 संस्था प्रत्यक्ष कार्यरत आहेत. कर्जवसुली हा अनेक संस्थांसमोरील मोठा अडथळा असून, त्यामुळे अनेक सौहार्द संस्था सेवा देण्यापासून दूर जात आहेत. कर्जदारांनीही घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करून संस्थांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ममदापूर विरक्तमठाचे श्री मुरुघेंद्र महास्वामीजी यांनी आशीर्वचन देताना सहकारी संस्थांनी सर्वसामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्य करावे, असे सांगितले. एकलव्याच्या कथेचा दाखला देत अदम्य इच्छाशक्ती आणि शिकण्याची जिद्द असेल तर जीवनात उच्च यश मिळविता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
बबलादी सदाशिव चंद्रगिरी मठाचे श्री श्री अप्पय्या अज्जनवर यांनी आशीर्वचन देताना शेतकरी, उद्योजक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांना सहकारी संस्था विविध माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचे कार्य करीत असल्याचे सांगितले. तसेच जीवनात दान, दया आणि परोपकार या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला व्हीडीए अध्यक्ष डॉ. गंगाधर संबण्णी, सहकारी क्षेत्रातील ज्येष्ठ नेते गुरुलिंगप्पा अंगडी, पालिकेचे माजी सदस्य उमेश वंदाल, सहकारी विकास अधिकारी एस. बसवराज, वेदांत केसरी सौहार्दचे अध्यक्ष मल्लू कलादगी, उपाध्यक्ष डॉ. आनंद चौधरी, संचालक डॉ. अरविंद ढाणकशिरूर, डॉ. मल्लप्पा हुग्गी, डॉ. बसवराज बडदाळ, डॉ. अजित गतातटे, शंकरराव जोशी, ईरन्ना अळ्ळगी, डॉ. सुधा करिलिंगण्णवर, सावित्री चिंचली आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या