प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. पत्रकार सन्मान निधीचा लाभ आतापर्यंत अत्यल्प पत्रकारांना मिळाला असून, राज्यातील सुमारे ३० हजार पत्रकारांपैकी केवळ तीन हजार पत्रकारांकडे अधिस्वीकृती आहे. त्यामुळे पत्रकारांना संरक्षण, पेन्शन आणि आरोग्य योजना देत असल्याचा सरकारचा दावा असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची टीका अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे पश्चिम महाराष्ट्र मेळावा, राष्ट्रीय कार्यकारिणी सभा आणि राज्यस्तरीय पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर भूमिका मांडताना देशमुख बोलत होते.
कार्यक्रमास मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, अनिल सिंग, मधू नैनन यांच्यासह मुंबई प्रेस क्लबचे सदस्य, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज काटकर, मावळते अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
सन्मान निधीपासून पत्रकार वंचित
एस. एम. देशमुख म्हणाले, पत्रकारांसाठी शासनाकडून विविध योजना जाहीर केल्या जात असल्या, तरी त्यांचा लाभ प्रत्यक्षात किती पत्रकारांना मिळतो, हा गंभीर प्रश्न आहे. पत्रकार सन्मान निधीचा लाभ आतापर्यंत केवळ १२४ पत्रकारांना मिळाला आहे. त्यापैकी सात ते आठ पत्रकार आज हयात नाहीत. त्यामुळे या योजनेची व्याप्ती वाढवून अधिकाधिक पात्र पत्रकारांना त्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे.
राज्यात सुमारे ३० हजार पत्रकार कार्यरत असताना केवळ तीन हजार पत्रकारांकडे अधिस्वीकृती आहे. अधिस्वीकृती मिळविताना पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आरोग्य योजनाही अधिस्वीकृतीशी जोडण्यात आल्यामुळे मोठ्या संख्येने पत्रकार या सुविधांपासून वंचित राहत आहेत. पत्रकारांच्या वास्तव परिस्थितीचा विचार करून शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
‘पत्रकार महामंडळाचे चॉकलेट कशासाठी?’
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पत्रकार महामंडळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र राज्यात आधीच असलेल्या ७८ महामंडळांची परिस्थिती समाधानकारक नाही. अनेक महामंडळांकडे आवश्यक कर्मचारी नाहीत, कार्यालयीन सुविधा नाहीत, बसण्यासाठी जागा नाही. अशा परिस्थितीत पत्रकारांना महामंडळाचे चॉकलेट का दाखविले जात आहे, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला.
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र महामंडळ उभारण्यापेक्षा प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर प्रभावी आणि स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणे अधिक गरजेचे आहे. ज्येष्ठ पत्रकार तसेच निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश असलेली स्वतंत्र यंत्रणा स्थापन करून पत्रकारांचे संरक्षण, हक्क आणि प्रश्न एकाच छत्राखाली सोडविण्याची व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘महामंडळे म्हणजे पत्रकारांची फसवणूक आहे. पत्रकारांच्या चळवळींचा बुद्धिभेद करून त्यांना नाउमेद करण्याचा कार्यक्रम सुरू आहे,’ अशी टीकाही देशमुख यांनी केली.
पत्रकारांवरील हल्ल्यांचा ठाम निषेध करणार
पत्रकारांवर हल्ले झाल्यास पत्रकार संघटनांनी एकजुटीने आणि ठामपणे त्याचा निषेध करणे आवश्यक आहे. पत्रकारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी परिषदेची भूमिका असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
डिजिटल माध्यमांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक माध्यमांसोबतच डिजिटल पत्रकारितेचा विस्तार होत असल्याने पत्रकारांनी बदलत्या माध्यमविश्वाशी जुळवून घेणे गरजेचे आहे. डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे काम डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवराज काटकर यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिवराज काटकर यांची निवड करण्यात आली. सांगली जिल्ह्याला प्रथमच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाल्याने काटकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. मावळते राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी शिवराज काटकर यांच्याकडे पदभार सोपविला.
सांगली जिल्ह्यातील विविध दैनिकांच्या संपादकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. मुंबई प्रेस क्लबच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व पदाधिकारी व पत्रकारांचा सत्कार एस. एम. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा व राज्य कार्यकारिणीवर निवडी
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रवीण शिंदे, तर कार्याध्यक्षपदी तुकाराम धायगुडे यांची निवड करण्यात आली.
डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन राजमाने, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रताप मेटकरी, कार्याध्यक्षपदी प्रकाश सूर्यवंशी यांची निवड झाली. हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव, तर कार्याध्यक्षपदी शैलेश पेटकर यांची निवड करण्यात आली.
डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणीवर तानाजीराजे जाधव, कुलदीप देवकुळे आणि संजय माळी यांची निवड झाली. मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणीवर विकास सूर्यवंशी आणि अविनाश कोळी यांची निवड करण्यात आली.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा काढण्यात आली. पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा, राष्ट्रीय कार्यकारिणी सभा, पदग्रहण समारंभ, संपादक सत्कार आणि पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांचा मेळावा अशा विविध उपक्रमांनी दिवसभर कार्यक्रमाची रंगत वाढली.
प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी पत्रकारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पत्रकारांच्या प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर चर्चा, बदलत्या माध्यमविश्वातील आव्हाने आणि पत्रकारितेतील विश्वासार्हता या विषयांवरही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
विश्वासार्हता जपणे ही पत्रकारांची जबाबदारी : सुरेंद्र गांगण
मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण म्हणाले, कोविडनंतर माध्यम क्षेत्र विविध संकटांना सामोरे जात आहे. बदलत्या काळात माध्यमांसमोर आर्थिक, तांत्रिक तसेच विश्वासार्हतेची आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत माध्यमांची विश्वासार्हता जपणे ही प्रत्येक पत्रकाराची जबाबदारी आहे.
माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी पत्रकारांनी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, सत्य आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासमोर वास्तव मांडण्याचे काम पत्रकारांनी प्रामाणिकपणे करावे, असे आवाहन गांगण यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या