सांगली प्रतिनिधी : डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचा ऐतिहासिक वारसा, उज्ज्वल शैक्षणिक परंपरा तसेच संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासकीय प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी (सांगली)चे अध्यक्ष श्री. अनंत जोशी तसेच डॉ. विश्राम लोमटे यांचे संस्थेचा कारभार सुव्यवस्थितपणे चालविण्यासह शैक्षणिक कार्याचा विस्तार करण्यामध्ये मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या योगदानाबद्दल कार्यक्रमात विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तृतीय वर्षाची विद्यार्थिनी अदिती शेंडेकर हिने केले. आपल्या मनोगतातून तिने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दीर्घ आणि गौरवशाली इतिहासाची तसेच संस्थेच्या उज्ज्वल परंपरेची माहिती उपस्थितांना करून दिली.
यावेळी प्रा. प्रिती जंगम तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना शिंदे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. संस्थेने शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. किशोर चंदुरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अबोली पिंजरकर, सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी समृद्धी सोकाशी, विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य कोठावळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी मयुरी वावरे, विद्यार्थी क्रीडा प्रतिनिधी मारुती वाघमोडे, राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी मंतेश लोखंडे तसेच राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थिनी प्रतिनिधी अदिती शेंडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा समारोप तृतीय वर्षाचा विद्यार्थी शुभम आष्टेकर याच्या आभार प्रदर्शनाने झाला. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या गौरवशाली वाटचालीचे स्मरण करून भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या