सांगली प्रतिनिधी : कुपवाड येथे स्वातंत्र्यदिनी किरकोळ वादातून मोहन केसरेकर व मनीषा केसरेकर या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलन तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला असून मोहन केसरेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणातील आरोपी फरीद शेख याच्याविरुद्धचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, सरकारी वकिलाची नियुक्ती करावी तसेच आरोपीच्या घराबाबत कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रमोद भोकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार नितीन राजे शिंदे म्हणाले, “कुपवाड येथे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलाची नियुक्ती करून प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीने परवानगी न घेता घर बांधले असल्यास त्याची कायदेशीर चौकशी करून संबंधित प्रशासनाने नियमानुसार कारवाई करावी.”
आंदोलनावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष पै. प्रदीप निकम, मनोज साळुंखे, दत्तात्रय भोकरे, अनिरुद्ध कुंभार, रवींद्र वादवणे, सोमनाथ गोटखिंडे, गजानन माने, दिग्विजय शिंदे, अनिकेत कुंभार, प्रकाश निकम, दीपक मोडक, बाळासाहेब मोहिते, शिवाजी पाटील, राम काळे, सविता मदने, कृष्णा नायडू, शुभम खोत, विनायक ठोंबरे, गोपाराव माने, जालिंदर पारणे, गजानन कोळेकर, संजय पाटील, संभाजी जाधव, सागर पोद्दार, भरत माने, अमर पाटील, के. जी. पाटील, राजाराम नेलवे, महेश साळुंखे, रमेश जाधव, बाजीराव पायमल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने पुढील कारवाई कायदेशीर मार्गाने होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या