पलूस प्रतिनिधी : भारतीय शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भक्तिसंगीत क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजित कडकडे यांना
प्रतिष्ठित ‘पंडित विष्णू दिगंबर पलुसकर जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने यावर्षीपासून पुरस्कार सुरू करण्यात येत आहे. अशी घोषणा समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. या पुरस्काराचा पहिला मान शास्त्रीय गायक अजित कडकडे यांना मिळणार आहे. दि. 30 ऑगस्ट २०२६ रोजी पलूस येथे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल अजित कडकडे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
प्रदीपआप्पा कदम म्हणाले, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांची १८ ऑगस्ट रोजी जयंती तर २१ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी असते. पलूस ही त्यांची जन्मभूमी असल्याने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर (१८ ऑगस्ट १८७२ – २१ ऑगस्ट १९३१) हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील महान गायक, संगीतकार आणि संगीताचे प्रभावी प्रसारक होते. त्यांनी शास्त्रीय संगीत राजघराण्यांच्या चौकटीतून बाहेर काढून ते सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे ऐतिहासिक कार्य केले. भारतीय संगीताच्या लोकाभिमुख प्रसारामध्ये पलुससकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ‘रघुपती राघव राजा राम’ या प्रसिद्ध भजनाची चाल तसेच ‘वंदे मातरम्’ गीताचे सध्या प्रचलित असलेले स्वरूप त्यांनी तयार केले, अशी माहिती प्रदीपआप्पा कदम यांनी दिली.
“पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हे केवळ पलूसचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि भारतीय संगीतविश्वाचे भूषण आहेत. त्यांच्या स्मृती जपणे आणि त्यांच्या नावाने संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकाराचा गौरव करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे प्रदीपआप्पा कदम यांनी सांगितले.
*पहिल्याच वर्षी शास्त्रीय गायक अजित कडकडे यांची निवड*
शास्त्रीय गायक अजित सदानंद कडकडे हे हिंदुस्थानी शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भक्तिगीतांचे प्रसिद्ध गायक आहेत. ११ जानेवारी १९५१ रोजी डिचोली, गोवा येथे जन्मलेल्या पंडित कडकडे यांनी आपल्या दमदार आणि खणखणीत आवाजाने संगीत क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
संगीत मार्तंड पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या तालमीत त्यांनी तब्बल १२ वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय संगीताचे कठोर शिक्षण घेतले. त्याचबरोबर पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून भजने, सुगम संगीत आणि संतपरंपरेतील रचनांचे शिक्षण घेतले.
शास्त्रीय संगीतासोबतच नाट्यसंगीत, भावगीत, अभंग, गौळणी आणि भक्तिसंगीत या विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपल्या गायकीची स्वतंत्र छाप पाडली आहे. विशेषतः साईबाबा, दत्त महाराज आणि विठ्ठल यांच्या भक्तिगीतांमुळे त्यांना महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांचा भारदस्त आवाज, सुरांवरील अचूक पकड, प्रभावी ताना आणि भावपूर्ण सादरीकरण ही त्यांच्या गायकीची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. त्यांच्या संगीत कारकिर्दीत २०० हून अधिक ऑडिओ अल्बम तसेच भारत आणि परदेशातील असंख्य संगीत मैफिलींचा समावेश आहे.
‘गोमंत विभूषण’सह अनेक मान-सन्मान
अजित कडकडे यांच्या प्रदीर्घ संगीत साधनेची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. गोवा सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘गोमंत विभूषण’, ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’, ‘गान समर्थ’ उपाधी, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार तसेच उस्ताद अलाउद्दीन खान पुरस्कार यांसारख्या विविध सन्मानांनी त्यांचा गौरव झाला आहे.
अशा या ज्येष्ठ आणि लोकप्रिय गायकाची ‘पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर जीवन गौरव पुरस्कारासाठी’ पहिल्याच वर्षी झालेली निवड ही या पुरस्काराची महत्वाची ठरली आहे.
30 ऑगस्ट रोजी पलूस येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. संगीत, साहित्य, कला, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शास्त्रीय गायक अजित कडकडे यांचा जीवनगौरव करण्यात येणार आहे.
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या नावाने सुरू झालेला हा पुरस्कार आणि पहिल्याच वर्षी शास्त्रीय गायक अजित कडकडे यांची झालेली निवड यामुळे पलूसच्या सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या