प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : महावितरणकडून ग्राहकांना अचूक आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 'स्मार्ट मीटर' बसवले जात आहेत. मात्र, या स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनात असलेल्या शंका आणि अफवांचे निरसन करण्यासाठी महावितरणने महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे.महावितरणने दिलेल्या स्पष्टतेनुसार प्रमुख मुद्दे:
स्मार्ट मीटर म्हणजे काय?:
हे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक मीटर असून, वीज वापराशी संबंधित माहिती डिजिटल पद्धतीने व्यवस्थितपणे संकलित करण्यास मदत करते.
वीज वापर वाढतो का?:
नाही, स्मार्ट मीटर स्वतः वीज वापर वाढवत नाही. ग्राहक जितकी वीज वापरेल, तेवढ्याच वापराची अचूक नोंद या मीटरमध्ये होते.
बिल जास्त येते का?:
बिलाची रक्कम ही केवळ प्रत्यक्ष झालेला वीज वापर आणि लागू असलेल्या वीजदरांनुसारच ठरते. बिलाबाबत काही शंका असल्यास अधिकृत माध्यमातून तपासणी किंवा तक्रार करता येते.
मुख्य फायदे:
डिजिटल पद्धतीने मीटर डेटा व्यवस्थापन, ग्राहकांना स्वतःच्या वीज वापराविषयी अचूक माहिती आणि आधुनिक वीज वितरण व्यवस्थेला गती मिळणे हे याचे मुख्य फायदे आहेत.
तक्रारी व शंकांचे निरसन:
बिलाविषयी शंका किंवा तक्रार असल्यास ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत ग्राहक सेवा माध्यमातून नोंदवून पाठपुरावा करावा.
छेडछाड करू नये:
मीटर, सील किंवा वीज जोडणीमध्ये कोणत्याही प्रकारची अनधिकृत छेडछाड करू नये. असा प्रकार आढळल्यास तात्काळ अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधावा.
"स्मार्ट मीटर स्मार्ट ग्राहक" हे बोधवाक्य लक्षात ठेवून ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता महावितरणच्या या आधुनिक उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या