प्रतिष्ठा न्यूज
कडेगाव प्रतिनिधी : देशातील पहिल्या मानवनिर्मित यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभ्यारण्याचे जनक स्व. वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा यंदाचा 'वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार' घाटनांद्रे (ता.कवठेमहांकाळ ) येथील पत्रकार , सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते प्रवीण शिंदे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती वृक्षमित्र धों.म.मोहिते चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष रानकवी सु.धों.मोहिते व अमृतवेलचे धर्मेंद्र पवार यांनी दिली.
मोहित्यांचे वडगाव ( ता.कडेगाव ) येथे वृक्षमित्र धों.म. मोहिते सदनमध्ये झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते मारुती शिरतोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. रानकवी सु.धों.मोहिते, बाळासाहेब मोहिते, दत्तात्रय सपकाळ, दीपक पवार , रोहित मोहिते, देवकुमार दुपटे उपस्थित होते.
प्रवीण शिंदे यांनी पत्रकारितेबरोबर सामाजिक व पर्यावरणीय प्रश्नांवर प्रत्यक्ष जनआंदोलने उभारली आहेत. मिरज तालुक्यातील भोसे येथील ४०० वर्षे जुना ऐतिहासिक वटवृक्ष महामार्गाच्या रुंदीकरणात वाचवण्यासाठी त्यांनी उभारलेला लढा अत्यंत गाजला. या आंदोलनाची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग बदलावा लागला होता. तसेच 'हेरिटेज ट्री' संकल्पनेसह राज्यातील वृक्ष संरक्षण कायद्यात सुधारणा घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे शिंदे यांनी जलसंधारण, निसर्गवारी उपक्रम, रक्तदान शिबिरे आणि 'राइट टू पी' सारख्या सामाजिक आंदोलनांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. पाणी फाउंडेशनचा 'जलरत्न' आणि राज्य शासनाचा 'राजमाता जिजाऊ पुरस्कार' यापूर्वी त्यांना मिळाला आहे.
वृक्षमित्र धों.म.मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार दि.६ सप्टेंबर रोजी सागरेश्वर अभयारण्यात होणाऱ्या आपली शिदोरी - आपले संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे मोहिते, पवार यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या