प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. ३ : राज्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ दै. तरुण भारतचे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर आवृत्तीचे संपादक शिवराज (आण्णा) काटकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पत्रकारितेतील निर्भीड भूमिका, संपादकीय नेतृत्व आणि पत्रकार संघटनांमधील सक्रिय योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही सर्वोच्च जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी किल्ले रायगड येथे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत त्यांना पदभार प्रदान करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही राज्यातील पत्रकारांची ८४ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली मातृसंस्था मानली जाते. या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर शिवराज काटकर यांची झालेली निवड ही केवळ वैयक्तिक सन्मानाची बाब नसून, मूल्याधिष्ठित, निर्भीड आणि जनतेशी बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा गौरव मानला जात आहे.
वार्ताहर म्हणून सुरू झालेल्या त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाने संपादकपदापर्यंत यशस्वी मजल मारली. तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी बदलत्या पत्रकारितेचे भान ठेवत *तरुण भारत*ला आधुनिक मांडणी, आकर्षक सादरीकरण आणि आशयप्रधान संपादकीय दृष्टिकोन दिला. वाचकाभिमुख रचना, प्रभावी विषय निवड आणि काळानुरूप बदल स्वीकारण्याच्या भूमिकेमुळे *तरुण भारत*ने नव्या वाचकवर्गात वेगळी ओळख निर्माण केली.
'खरे ते खरे आणि चुकीचे ते चुकीचे' ही भूमिका कायम जपत त्यांनी पत्रकारितेची वाटचाल केली. सत्ता कोणाचीही असो, जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठविणे, अन्यायाविरोधात लेखणी चालविणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ठळक वैशिष्ट्ये राहिली आहेत.
पत्रकारांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करणारा आणि अडचणीच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा नेता म्हणूनही शिवराज काटकर यांची ओळख आहे. पदाचा बडेजाव न मिरवता साधेपणा, अभ्यासू वृत्ती आणि माणुसकी जपणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे राज्यभरातील पत्रकारांमध्ये त्यांनी विशेष विश्वास संपादन केला आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या त्यांच्या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मराठी पत्रकारितेला अधिक सक्षम दिशा देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या