अंकलखोप, दि. २ : अंकलखोप येथील पोल व्हॉल्ट खेळाडूंसाठी ऐतिहासिक ठरलेल्या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते नव्या पोल व्हॉल्ट लँडिंग मॅटचे पूजन व उद्घाटन करण्यात आले. हुतात्मा भगतसिंग हायस्कूलच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
गेल्या पाच वर्षांपासून अत्यंत मर्यादित व जुन्या साहित्यावर सराव करणाऱ्या अंकलखोपच्या पोल व्हॉल्टपटूंसाठी हा क्षण अत्यंत दिलासादायक ठरला. लोकसहभाग आणि प्रदीपआप्पा कदम यांच्या भक्कम सहकार्यामुळे अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत पोल व्हॉल्टसाठी आवश्यक असलेले संपूर्ण साहित्य उपलब्ध झाले असून खेळाडूंचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे.
१ जुलै २०२६ रोजी पोल व्हॉल्ट साहित्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानंतर विविध स्तरांवर लोकसहभागातून प्रयत्न सुरू करण्यात आले. या मोहिमेला प्रदीपआप्पा कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने १ ऑगस्ट २०२६ रोजी आवश्यक असलेले संपूर्ण पोल व्हॉल्ट साहित्य उपलब्ध झाले.
यावेळी बोलताना प्रदीपआप्पा कदम म्हणाले, "ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. योग्य साहित्य, प्रशिक्षक आणि संधी मिळाल्यास येथील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक स्तरावर निश्चितच यश संपादन करतील. खेळाडूंच्या पाठीशी आपण कायम उभे राहू."
कार्यक्रमास राजेश फाउंडेशनचे राजेश चौगुले, भिलवडी पोलीस ठाण्याचे एपीआय दीड वाघ, विशाल सूर्यवंशी, संकेत सूर्यवंशी , निखिल सूर्यवंशी, अनिश शिकलगार, तुषार सूर्यवंशी, महेश हजारे, दौलत पाटील, राहुल पाटील, अरविंद लांडगे, संजय शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, खेळाडू, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन पोल व्हॉल्ट लँडिंग मॅट आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्यामुळे अंकलखोप येथील खेळाडूंना आता अधिक सुरक्षित वातावरणात सराव करता येणार असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये यश मिळविण्याच्या त्यांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळाली आहे. याबद्दल अंकलखोपमधील खेळाडू व ग्रामस्थांनी प्रदीपआप्पा कदम तसेच लोकसहभागातून मदतीचा हात देणाऱ्या सर्व दात्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप "खेळेगा इंडिया, तभी तो बढ़ेगा इंडिया!" या घोषणांनी उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
विशेष : पोल वॉल्ट मॅट (लँडिंग पिट) हे पोल वॉल्ट या खेळात वापरले जाणारे एक मोठे व जाड कुशन असते. ॲथलीट उंचावर उडी मारून बार पार केल्यानंतर सुरक्षितपणे खाली पडण्यासाठी (लँडिंगसाठी) या मऊ मॅटचा वापर केला जातो. त्यामुळे सराव व स्पर्धेदरम्यान दुखापतीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या