प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या प्रेरणेने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून संत निरंकारी मंडळ, मिरज शाखेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आळतेकर हॉल, मालगाव वेस, ब्राह्मणपुरी, मिरज येथे शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) सकाळी ९ ते सायंकाळी ९ या वेळेत झालेल्या शिबिरात तब्बल ३०० रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या सेवेत मोलाचे योगदान दिले.
या शिबिरात डॉ. शिरगावकर ब्लड सेंटर (सांगली), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी (मिरज) तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय रक्तपेढी (सांगली) यांच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. पी. डी. गुरव यांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी उपक्रमाचे कौतुक करत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. “रक्तदानासारखे मोठे दान दुसरे कोणतेही नाही. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांसाठी रक्तदान जीवनदायी ठरते. अनेकदा विशिष्ट रक्तगटाचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने अशा सेवाकार्यात सहभागी व्हावे,” असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, सतीश कदम (महसूल विभाग) तसेच मिरजचे ट्राफिक पोलीस निरीक्षक रणजित तिपे यांनी सदिच्छा भेट देऊन संत निरंकारी मिशनच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
शिबिरात सांगली, मिरज, नरवाड, सलगरे, देशिंग, कवठेमहांकाळसह परिसरातील विविध शाखांमधील मिशनचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले. याशिवाय डॉक्टर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, नागरिक आणि मिशनचे पदाधिकारी यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन ब्रँच मुखी सुनील पाटील जी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सांगली सेक्टरमधील सेवादल अधिकारी, सेवादार, विविध सत्संग शाखांचे प्रबंधक आणि भक्तगण यांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ या संत निरंकारी मिशनच्या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत या रक्तदान शिबिरातून समाजसेवा, मानवता आणि समर्पणाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या