सांगली : गेल्या महिनाभरात किरकोळ बाजारातील साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून, सुमारे ४२ रुपये किलोवरून साखरेचे दर ८० रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कमिटीचे सदस्य ॲड. सुभाष पाटील यांनी केला आहे. आगामी सणासुदीच्या काळात हे दर १०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र या दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळतोय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
साखरेच्या किरकोळ दरात झालेली वाढ पाहता सर्वसामान्य ग्राहकांना या दरवाढीचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत असल्याचे वाटू शकते. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे ॲड. पाटील यांनी म्हटले आहे. मागील गळीत हंगामातील ऊसाची संपूर्ण एफआरपी (Fair and Remunerative Price) अद्याप अनेक कारखान्यांकडून पूर्णपणे अदा झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गळीत हंगाम संपल्यानंतर १५ दिवस ते महिन्याच्या आत ऊसाची संपूर्ण एफआरपी देण्याची कबुली कारखानदारांनी ऊस दराच्या प्रश्नावर झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत दिली होती. मात्र या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ताही दिलेला नसल्याचा दावा ॲड. पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, गुजरात आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत ऊसाची रिकव्हरी कमी असूनही शेतकऱ्यांना चार हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन ऊस उत्पादकांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
“आपले कोणीच काही करू शकत नाही, अशा भ्रमात साखर कारखानदारांनी राहू नये. वातावरण बदलत आहे. शेतकरी आता प्रश्न विचारत आहेत आणि प्रश्नांची उत्तरे देण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे साखरेच्या वाढलेल्या दराचा योग्य लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कारखानदारांनी तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” असा इशारा ॲड. सुभाष पाटील यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या