प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हा संघटक अमोल काळे यांनी सुरू केलेल्या उपोषणाची दखल अखेर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतली आहे.काळे यांच्या प्रमुख मागण्यांवर बाजार समितीने निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.मागण्या मान्य केल्याने आमदार रोहित पाटिल,सभापती युवराज पाटिल,संचालक रवी पाटिल,अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित करण्यात आले.त्यामुळे बेदाणा बाजारातील व्यापारी पद्धतीला चाप बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.अमोल काळे यांना दिलेल्या पत्रात बाजार समितीने उपोषणादरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे.सॅम्पल बॉक्समधील मालाबाबत महत्त्वाचा निर्णय घेताना शेतकऱ्याच्या मालाची प्रतवारी करण्यासाठी आलेल्या सॅम्पल बॉक्समधून केवळ ४०० ग्रॅम माल वगळता इतर सर्व मालाची पट्टी शेतकऱ्यास मिळण्याबाबत बाजार समितीकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यास पट्टीचे पैसे देण्यास व्यापाऱ्यांना आडकाठी करता येणार नाही. यामध्ये व्यापाऱ्यांकडून काही चूक झाल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचा इशाराही बाजार समितीने दिला आहे. तसेच सॅम्पलसाठी घेतलेल्या मालाची उचल कमी करून सॅम्पलसाठी घेतलेला माल खरेदीदार व्यापाऱ्यांकडून त्याच बॉक्समध्ये टाकण्याबाबतही बंधन करण्यात येणार आहे.बेदाणा मालाचे पट्टी पेमेंट २१ ते २५ दिवसांच्या आत देणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे दीर्घकाळ अडकून राहण्यास आळा बसण्याची अपेक्षा आहे.
तसेच बेदाणा पट्टी पेमेंटमध्ये २ टक्के वजन न घेण्याच्या प्रथेलाही लगाम घालण्यात येणार आहे. याबाबत आडत्यांना बंधनकारक सूचना देण्यात येणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे.
बाजार आवारात पारदर्शकता वाढविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीने यापूर्वी बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणखी नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.याशिवाय वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीकडून तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. या सर्व निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी बाजार समितीकडून स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत देखरेख ठेवण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.बेदाणा उत्पादकांच्या मालाची प्रतवारी, सॅम्पलच्या नावाखाली होणारी मालाची कपात, पट्टीचे रखडलेले पैसे, वजनकपात आणि बाजारातील पारदर्शकता या मुद्द्यांवरून गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर अमोल काळे यांनी आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर बाजार समितीने थेट लेखी निर्णय देत मागण्यांच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिल्याने उपोषणाला पहिला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
मात्र, लेखी निर्णय प्रत्यक्षात किती कठोरपणे राबविला जातो, व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या कथित गैरप्रकारांवर कारवाई होते का आणि शेतकऱ्यांना वेळेत पट्टीचे पैसे मिळतात का, याकडे आता बेदाणा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या