प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी: भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा वर्धापन दिन सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मुख्यालय प्रांगणात अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महानगरपालिकेचे महापौर श्री. धीरज सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या सोहळ्याने सांगलीकरांमध्ये आनंदाची आणि अभिमानाची लाट निर्माण झाली होती.
सकाळी ठीक ८:०५ वाजता महापौर धीरज सूर्यवंशी यांनी राष्ट्रध्वजाला वंदन करून ध्वजारोहण केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी आणि नागरिकांनी राष्ट्रगीताच्या तालावर तिरंग्याला मानवंदना दिली.
स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत उपस्थितांनी 'भारत माता की जय' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या सोहळ्यास महानगरपालिका आयुक्त श्रीम. संजिता महापात्र (भा.प्र.से.), उपमहापौर श्री. गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती श्री. अतुल माने, सभागृह नेते श्री. संदीप आवटी, विरोधी पक्षनेते श्री. मंगेश चव्हाण, गटनेते श्री. मैनुद्दीन बागवान, श्री. अभिजीत कोळी, श्री. युवराज बावडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच महापालिकेच्या विविध उपसमित्यांचे सभापती, सन्माननीय पदाधिकारी, नगरसेवक, महानगरपालिकेचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्वांना शुभेच्छा देताना महापौर धीरज सूर्यवंशी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्षाच्या अमृतमहोत्सवी पर्वाचे महत्त्व विशद केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महापुरुषांनी आणि हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यांचे स्मरण करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासन शहरवासीयांच्या सोयीसुविधांसाठी आणि विकासासाठी कटिबद्ध असून, सर्वांच्या सहकार्यातून सांगली शहर अधिक समृद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि यशस्वी आयोजनासाठी महानगरपालिकेच्या सर्व संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. संपूर्ण महानगरपालिका मुख्यालय परिसराला तिरंग्याच्या रंगात सजविण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या