सांगली प्रतिनिधी : कुपवाड परिसरातील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाले. या घटनेत मनिषा मोहन केसरेकर (वय ३५) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर (वय ५४) गंभीर जखमी झाले. या प्रकरणातील संशयित आरोपी फरीद अब्दुल शेख (वय ५२) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासांत जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून फरीद शेख आणि केसरेकर कुटुंबीयांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर आरोपीने घरातून हातोडा व चाकू आणला. त्याने मोहन केसरेकर यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला, तसेच मनिषा केसरेकर यांच्या पोटात चाकूने वार केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान मनिषा केसरेकर यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्याचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.
दरम्यान, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत फरीद शेख हा मिरज-सांगली मार्गावरील वानलेसवाडी येथे बंद पडलेल्या मैत्रेय बिल्डिंगजवळ थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर हातोडा व चाकूने हल्ला केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी व पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
आरोपी फरीद अब्दुल शेख याला पुढील तपासासाठी एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या