प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राज्यात प्लास्टिकच्या फुलांच्या विक्रीवर बंदी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतरही गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत प्लास्टिकची फुले, हार आणि सजावटीच्या वस्तू सर्रास विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘बंदी कागदावर, प्लास्टिक बाजारात’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, नैसर्गिक फुलांना मागणी घटल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. महिनाभरापूर्वी किलोला सुमारे १०० रुपये मिळणाऱ्या फुलांचा दर आता अवघा ४० रुपयांवर आला आहे. उत्पादन, औषधे, मजुरी, तोडणी आणि वाहतूक खर्च वाढत असताना दर घसरल्याने फुलशेतकरी संकटात सापडले आहेत.एकीकडे शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलांना बाजार मिळत नसताना प्लास्टिकच्या फुलांची उघडपणे विक्री सुरू असल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत धडक कारवाई करून प्लास्टिकच्या फुलांची विक्री थांबवावी,अशी मागणी फुल उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.शेतकऱ्याचे फूल ४० रुपयांना आणि प्लास्टिकच्या फुलांना मोकळे रान; ही कोणती बाजारव्यवस्था? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या