सांगली, दि. २१ : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावर वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी पार पडली. बैठकीत आतापर्यंतच्या आंदोलनाचा आणि प्रशासकीय पाठपुराव्याचा आढावा घेत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. वाढीव घरपट्टीच्या विरोधात कायदेशीर लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना वाढीव घरपट्टी न भरण्याचे आवाहन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वाढीव घरपट्टीचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निश्चित करण्यात आले.
वाढीव घरपट्टीविरोधात जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत असून, लवकरच याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, कार्पेट एरिया अर्थात चटई क्षेत्राच्या आधारे घरपट्टी आकारणीबाबत मार्च २०२६ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने केलेल्या कायदेशीर तरतुदीची माहिती महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे समितीचे लक्ष आहे.
पालकमंत्र्यांसोबत कृती समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्यापक बैठक घेण्याचेही ठरविण्यात आले. या सर्व प्रयत्नांनंतरही वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास पुढील टप्प्यात महापालिका आयुक्त, महापौर आणि विरोधी पक्षनेते यांच्या निवासस्थानासमोर रात्री १० ते १२ या वेळेत ‘झोपमोड आंदोलन’ करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून समितीच्या माध्यमातून मोर्चे, निवेदने, जनआंदोलन, बंद तसेच विविध प्रशासकीय पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात येत आहे. नागरिकांच्या आर्थिक हिताशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर अन्यायकारक वाढीव घरपट्टीचा बोजा नागरिकांवर लादला जाऊ नये, यासाठी लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीस सतीश साखळकर, हणमंत पवार, एस. के. पाटील, व्ही. डी. बर्वे, आसिफ बाबा, युनूस महात, सलीम पन्हाळकर, किरण कांबळे, गजानन मिरजे, नितीन मिरजकर, रवी जय, रफिक महात, प्रा. जहांगीर तांबोळी, विलास घाडगे, ओमकार माने, शशिकांत गायकवाड, आर. आर. पाटील, सुलतान तांबोळी, अॅड. उमेश शस्त्रबुद्धे, दिलीप शिंदे, बी. एम. शिंदे, संगीता शिंदे, रेहाना शेख, रघुनाथ घाडगे आदी उपस्थित होते.
— वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या