जत : सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असताना दुष्काळग्रस्त जत तालुका मात्र तीव्र पाणीटंचाईच्या संकटाला सामोरा जात आहे. या पार्श्वभूमीवर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करून जत तालुक्याला पाणी सोडावे, अन्यथा प्रहार जनशक्ती संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा संघटनेचे जत तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांनी दिला आहे.
सध्या वरच्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीत मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र जत तालुक्यातील अनेक विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या असून पिके करपू लागली आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. उपलब्ध पाण्याचा समन्यायी वापर करून दुष्काळग्रस्त जत तालुक्याला तातडीने दिलासा देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे बागडे यांनी स्पष्ट केले.
"एकीकडे कृष्णा नदी भरून वाहत आहे, तर दुसरीकडे जतचा शेतकरी पाण्याच्या एका थेंबासाठी हवालदिल झाला आहे. जलसंपदा विभागाने कोणताही विलंब न करता म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सर्व टप्पे पूर्ण क्षमतेने सुरू करून पाणी जतकडे वळवावे. अन्यथा प्रहार जनशक्ती संघटना शेतकरी व नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल," असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी प्रहार जनशक्ती संघटनेने शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सर्व टप्पे तातडीने सुरू करणे, जत तालुक्यातील पाझर तलाव व साठवण तलाव भरून काढणे तसेच शेती आणि जनावरांसाठी प्राधान्याने पाण्याचे नियोजन करणे या मागण्यांचा समावेश आहे.
प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन निर्णय घ्यावा, अन्यथा जत तालुकाभर व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा सुनील बागडे यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या