प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत सात जणांचे दुकान परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली असली,तरी या कारवाईनंतरही दुकाने पुन्हा थाटात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. त्यामुळे प्रशासनाची कारवाई नेमकी किती प्रभावी,की केवळ कागदावरच? असा सवाल आता उपस्थित होत आहे.अन्न व औषध प्रशासनाने मागील काही दिवसांत शहरासह तालुक्यातील हॉटेल, बेकरी, दूध डेअरी, स्वीट मार्ट, एजन्सी, कृषी उद्योग आणि बाजारपेठेतील आस्थापनांवर कारवाई केली.स्वच्छतेचा अभाव, अन्नपदार्थांची नियमबाह्य हाताळणी, पॅकेजिंग व एक्सपायरीबाबतचे नियम धाब्यावर बसविणे अशा प्रकारांवर प्रशासनाने बडगा उगारल्याचे सांगण्यात आले.मात्र,कारवाईचा गाजावाजा झाल्यानंतरही काही ठिकाणी परिस्थितीत फारसा फरक पडलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.काही हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी स्वच्छतेचे नियम पाळले जात नाहीत,परिसरात अस्वच्छता असते,तसेच वेटरकडून पान, तंबाखू, गुटखा सेवनासारखे प्रकार होत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत.विशेष म्हणजे,कारवाई झालेल्या आस्थापनांपैकी काही ठिकाणी पुन्हा व्यवसाय सुरू झाल्याची चर्चा असल्याने प्रशासनाच्या कारवाईनंतरचा पुढील तपास नेमका कुठे गेला? कारवाईनंतर नियमांची अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी कोण करणार? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय असल्याने केवळ परवाने रद्द करणे किंवा दंडात्मक कारवाई करून थांबणे पुरेसे नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर सातत्याने तपासणी, ठोस दंडात्मक कारवाई आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
‘कारवाई झाली’ एवढ्यावर प्रशासनाने समाधान मानू नये; प्रत्यक्षात नियम पाळले जात आहेत का, हे तपासणे अधिक महत्त्वाचे आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच राहणार आणि कारवाईचा फार्स असल्याची चर्चा अधिकच रंगणार, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या