सांगली, दि. १५ : देशभर स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना कुपवाड शहरात मात्र संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी फुले- शाहू- आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना महापालिका मुख्यालयासमोर 'जनआक्रोश धरणे आंदोलन' करण्याची वेळ येणे, हे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रशासनाचे दुर्दैव असल्याची तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.
देश स्वतंत्र झाला; पण कुपवाडमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी आंदोलन का करावे लागत आहे? खरंच बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळाले आहे का? असा थेट सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला.
सि. स. नं. ७७४ च्या भूखंडावरून वाद चिघळला
कुपवाड शहरातील महावीर व्यायाम मंडळाजवळील सि. स. नं. ७७४ या खुल्या भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्याची मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्ह्याच्या वतीने १ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली होती.
मात्र, आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेच्या महासभा क्रमांक ०२, ठराव क्रमांक १७७, विषय क्रमांक १ (ज), दिनांक १८ मार्च २०२६ मध्ये या जागेवर तिरंगा ध्वजस्तंभ व परिसर विकासाचा निर्णय नमूद असताना 'कै. आमदार शरद पाटील स्मृती उद्याना'चा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
त्यानंतर उपमहापौर गजानन राम मगदूम यांच्या दिनांक २९ जून २०२६ रोजीच्या पत्रव्यवहारातून सुमारे ₹१.५० कोटींच्या निधीचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आणि पुढे स्थायी समिती सभा क्रमांक १९, दिनांक ३० जुलै २०२६, ठराव क्रमांक ७३ मध्ये संबंधित प्रस्ताव मंजूर झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
'एकाच जागेसाठी दोन निर्णय कसे?' प्रशासनाला जाब
एकाच भूखंडासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे निर्णय का घेतले गेले? मूळ ठरावात नमूद नसलेला विषय नंतरच्या पत्रव्यवहारातून कसा पुढे आला? ११.५० कोटींच्या निधीची प्रक्रिया नेमकी कोणत्या आधारावर करण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाने जनतेसमोर ठेवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करताना संबंधित कागदपत्रे, प्रस्ताव, मंजुरी, अंदाजपत्रके, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी आणि निधी प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली.
अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करा
या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त, उपमहापौर, संबंधित सुचक-अनुमोदक, शाखा अभियंता, नगर अभियंता व शहर अभियंता यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आजतागायत केलेल्या निर्णयांची व कामकाजाची स्वतंत्र चौकशी करून, कायद्यानुसार आवश्यक असल्यास त्यांच्या मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची सक्षम यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
'बाबासाहेबांचा पुतळा हा केवळ पुतळा नाही; तो संविधानिक अस्मितेचा प्रश्न !'
आंदोलनकर्त्यांच्या मते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी ही केवळ एका पुतळ्याची मागणी नसून समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि संविधानिक मूल्यांचा सन्मान करण्याची मागणी आहे. त्यामुळे १५ ऑगस्टसारख्या राष्ट्रीय पर्वाच्या दिवशीच संविधानाच्या शिल्पकारांच्या पुतळ्यासाठी जनआंदोलन करावे लागणे, ही बाब प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
SIT चौकशीची जोरदार मागणी
सि. स. नं. ७७४ संदर्भातील सर्व ठराव, पत्रव्यवहार, निधी प्रस्ताव आणि प्रशासकीय प्रक्रियेची SIT अथवा सक्षम स्वतंत्र चौकशी यंत्रणेमार्फत चौकशी करावी. चौकशीत गैरप्रकार, नियमभंग अथवा अधिकाराचा गैरवापर आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या कागदोपत्री निर्णयांपेक्षा संविधान आणि जनतेचा अधिकार मोठा आहे. कुपवाडच्या सि. स. नं. ७७४ या भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्याच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्व
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, तसेच वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन, समता सैनिक दल, तसेच फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी केले आहे.
यावेळी, संजय संपत कांबळे, संजय भूपाल कांबळे, प्रशांत संगाप्पा वाघमारे, अनिल मोरे (सर), किशोर आढाव, जगदीश कांबळे, हिरामन भगत, युवराज कांबळे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, पवन वाघमारे, ऋषीकेष माने, सम्यक विद्यार्थी आंदोलन, अशोक लोंढे, मोहन साबळे, विनायक मोरे, अशोक कांबळे, गॅब्रिएल तिवढे, विनोद तांदळे, अनिल सावंत, वैभव रांजणे, गौतम भगत, दिक्षा पवार, सिद्धार्थ पवार, अक्षय मागाडे, मधुकर शेस्वरे
आदी बहुसंख्य चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या