सावळज दि. 20 : सावळज (ता. तासगाव) येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना केशर आंबा कलमांचे मोफत वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
मिडास प्रकल्पातील लाभार्थी शेतकऱ्यांना कलम लागवडीपासून काढणीपर्यंत सातत्याने मार्गदर्शन दिले जाते. तसेच काढणीनंतर मार्केट लिंकेज व व्हॅल्यू ॲडिशनसाठीही संस्थेकडून सहकार्य केले जाते.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या (RAFTAAR) घटकांतर्गत कोरोना काळात सुरू झालेली 'शेतकरी ते ग्राहक' शेतमाल विक्री सेवा आता सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विस्तारली असून शेकडो शेतकरी याचा लाभ घेत आहेत. लहानातील लहान शेतकऱ्यांचा सहभाग, सॉर्टिंग-ग्रेडिंग, मागणीनुसार पुरवठा, डिजिटल व्यासपीठ, नोंदणीकृत व्यापारी तसेच कृषी व पणन विभागाचे पाठबळ ही या सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या माध्यमातून सहभागी शेतकऱ्यांना प्रत्येक विक्रीमागे साधारण १० ते ५०% मूल्यवर्धन मिळत असल्याचे संस्थेने सांगितले.
मुंबई बाजारपेठेतील या शेतमाल विक्री व्यवस्थेसाठी श्रवण गुप्ता, जय खिलारी, गणेश जाधव, आणि राहुल आमने या टीमने विक्री व्यवस्था मिळवून देण्यात मोलाची मदत केली आहे, मुंबईच्या टीमने शेतकऱ्यांना रोपे लावण्यासाठी आर्थिक मदत दिली
या उपक्रमाचा प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले.
बाळासाहेब माने म्हणाले, "माझी ३ क्रेट द्राक्षे बऱ्याच वर्षापासून विकली जात नव्हती, त्यामुळे आम्ही ती फक्त घरीच खात होतो. मात्र माझीशेतीच्या माध्यमातून तीच द्राक्षे मुंबई बाजारात विकली गेली.
शीतल माळी यांनी सांगितले की आमची जांभळे आतापर्यंत घरी शेजारी व पाहुण्यांमध्येच संपायची, बरीचशी जमिनीवर पडून खराब व्हायची. यंदा मात्र मी ५ हजार रुपयांची जांभळे विकली.
श्रीकांत पाटील यांच्या मते, "दुधी भोपळा विक्रीत आतापर्यंतची सर्वाधिक चांगली खरेदी किंमत मला माझीशेती व्यासपीठावरच मिळाली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश बोरगे यांनी विश्वास व्यक्त केला की शेतकऱ्यांच्या सध्याच्या अनुभवावरून माझीशेतीची ही विक्री व्यवस्था सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणेल.
वृक्षारोपण कार्यक्रमात संस्थेचे स्वयंसेवक श्री. विठ्ठल पाटील, श्री. श्रेयस अवसरे, श्री. राहुल लिगाडे, श्री. वेदान्त पाटील, श्री. प्रतीक निकम तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या