प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव शहरासह परिसरात सोमवारी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.शहरातील विविध भागांत नागराजांच्या मूर्तींची सुवासिनींनी विधिवत पूजा केली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेल्या नागराजांच्या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.नागपंचमीच्या निमित्ताने मानकरी असलेल्या नाभिक समाज बांधवांनी यावर्षी प्रथमच आकर्षक अशा पितळी नागराजांच्या दोन मूर्ती तयार करून त्यांची प्रतिष्ठापना करण्याचा कार्यक्रम रविवारी रात्री आयोजित केला होता. यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते दोन्ही मूर्तींना दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर शंखनादात विधिवत पूजा करून मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पितळी मूर्तींसमोर पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या मातीच्या नागराजांच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी श्री. व सौ. मोहन खंडागळे तसेच श्री. व सौ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या सोहळ्याच्या आयोजनासाठी सुदाम खंडागळे, जयवंत खंडागळे, मोहन खंडागळे, आप्पासाहेब गायकवाड, सुनील गायकवाड, प्रविण जाधव, राहुल खंडागळे, गोरख गायकवाड, निलेश गायकवाड, प्रशांत खंडागळे, रमेश गायकवाड, मंथन खंडागळे, ऋषिकेश गायकवाड, हरी खंडागळे यांच्यासह समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
*मिरवणुकीने शहर दणाणले*
सोमवारी सकाळी नागराज गल्ली व परिसरातील सुवासिनींच्या हस्ते नागराजांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दोन्ही नागराजांच्या मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली.नागराज गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, गुरुवार पेठ, गणपती मंदिर चौक, पोस्ट, सिद्धेश्वर चौक, वंदेमातरम चौक, बागणे चौक, सराफ पेठ, सोमवार पेठ, दाणे गल्ली या प्रमुख मार्गांवरून मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तिमय वातावरणामुळे शहरात नागपंचमीचा उत्साह दिसून आला.गणपती मंदिर चौक येथे एका नागराजाच्या मूर्तीची, तर सोमवार पेठ-दाणे गल्ली येथे दुसऱ्या नागराजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिवसभर सुवासिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागराजांचे पूजन केले.तासगावातील वरचे गल्ली येथेही नाभिक समाज बांधवांनी नागराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.येथे सुवासिनींनी गर्दी करून नागराजांचे पूजन केले. तसेच कवठेएकंद येथेही नाभिक समाजाच्या वतीने नागराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ठिकाणीही नागपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला.सायंकाळी पारंपरिक पद्धतीने मातीच्या नागराजांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
*नागपंचमीला व्यवसाय बंद ठेवण्याची परंपरा कायम*
नागपंचमीच्या दिवशी नाभिक समाज बांधवांनी परंपरेप्रमाणे आपले व्यवसाय दिवसभर बंद ठेवले होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यावर्षीही जपण्यात आली. नागपंचमीच्या धार्मिक आणि पारंपरिक महत्त्वाची जपणूक करत ही परंपरा पुढील काळातही कायम ठेवण्याचा मानस नाभिक समाज बांधवांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या