मिरज, प्रतिनिधी : ज्ञान, संस्कार आणि आधुनिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा जोपासणाऱ्या गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट संचलित गुलाबराव पाटील डी.एड. महाविद्यालय, मिरज येथे डी.एड. प्रथम वर्षातील नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साह, प्रेरणा आणि नवचैतन्याच्या वातावरणात संपन्न झाला. भावी शिक्षकांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या कार्यक्रमात मान्यवरांनी शिक्षणासोबत चारित्र्य, शिस्त, वाचनसंस्कृती आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाची गरज अधोरेखित करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याचा मंत्र दिला.
प्रमुख अतिथी मा. अॅड. उदयकुमार मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सहकार क्षेत्रातील समृद्ध वारसा लाभलेल्या गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टने शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचे कार्य हाती घेतले आहे. डी.एड., बी.एड., नर्सिंग, बीएचएमएस मेडिकल, फिजिओथेरपी, डी.फार्मसी महाविद्यालये तसेच सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळांद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करण्यात आली आहेत. "शिस्त, सदाचार, सत्य, नम्रता आणि कठोर परिश्रम या मूल्यांवर उभा राहणारा शिक्षकच समाजाला योग्य दिशा देऊ शकतो," असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या आहारी न जाता वाचन, चिंतन आणि मनन यांची सवय लावण्याचे आवाहन केले.
संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आणि आदर्श शिक्षक आहेत." विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि संस्कारक्षम नागरिक घडविण्याची परंपरा जीपीएमटीने जोपासली आहे. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असून, जागतिक स्पर्धेच्या युगात इंग्रजी संभाषणावरील प्रभुत्व ही प्रत्येक विद्यार्थ्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय समारोपात डी. एड. प्राचार्या ख्रिस्टीना मार्टिन यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, सराव, परिश्रम, जिद्द आणि नम्रता या पंचसूत्रीचा जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन केले. "विद्यार्थीदशेत जितके अधिक वाचन, तितके व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. समाजाला सुसंस्कृत आणि जागरूक नागरिक देणारा आदर्श शिक्षक बनण्याचे ध्येय प्रत्येकाने बाळगावे. भविष्यात तुम्ही माझे विद्यार्थी आहात, असे अभिमानाने सांगता यावे, अशी तुमची वाटचाल असावी. या ज्ञानसागरातील मोती वेचण्यासाठी सदैव तत्पर राहा. जीपीएमटी परिवारात तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे," असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील, कॅम्पस कॉर्डिनेटर सतीश पाटील, प्राचार्य डॉ. बी. एन. कराळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा सूर्यवंशी व मेघा चव्हाण यांनी प्रभावीपणे केले, तर अर्चना मोहिते यांनी आभार मानले. हा स्वागत समारंभ यशस्वी करण्यासाठी डी.एड. व बी.एड. विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या