प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :महाविद्यालयीन जीवन हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे महत्त्वाचे पर्व असून, याच काळात भावी आयुष्याचा भक्कम पाया रचला जातो. त्यामुळे शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत स्पर्धा परीक्षांसह विविध क्षेत्रांसाठी आतापासूनच तयारी करून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकसित करावे, असे प्रतिपादन तासगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी केले.महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी उद्बोधन (इंडक्शन) कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुरेश एस. पाटील होते.यावेळी बोलताना सुधाकर लेंडवे म्हणाले, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यासोबतच मोठी जबाबदारीही स्वीकारावी लागते.आपल्या आवडीनिवडी ओळखून त्यानुसार सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे.स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम समजून घेऊन नियोजनबद्ध तयारी महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरू करावी.भारताचे तत्त्वज्ञान,संस्कृती आणि साहित्याचा अभ्यास करून व्यापक दृष्टीकोन विकसित करावा.अपयशाने खचून न जाता आत्मविश्वासाने पुढे जात फायनान्स, लॉ तसेच अन्य क्षेत्रांतील करिअरच्या संधींचा लाभ घ्यावा. नैतिक मूल्ये आणि उत्तरदायित्वाची जाणीव असलेले जबाबदार नागरिक घडविण्यात महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुरेश एस. पाटील यांनी महाविद्यालयातील विविध विभाग, उपक्रम आणि कौशल्य विकासाच्या संधींची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संशोधन, नवोपक्रम, विविध उपक्रम आणि कौशल्य विकासात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा.पालकांच्या अपेक्षा पूर्ण करत उच्च ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे,असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.जीवन घोडके यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. सविता कोळेकर यांनी केले, डॉ. प्रगती जाधव यांनी आभार मानले.यावेळी प्रा.जे. ए. यादव, डॉ. एन. ए. कुलकर्णी, डॉ. जीवन घोडके यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या