प्रतिष्ठा न्यूज
सांगली, प्रतिनिधी : अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निकालाची राज्य सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती, सांगली जिल्हा यांच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ (क्रांतीदिन) रोजी सांगलीत भव्य मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे नेते प्रशांतभाऊ सदामते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मातंग समाजासह अनुसूचित जातीतील विविध घटकांना सामाजिक न्याय, समान हक्क व प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी अनेक वर्षांपासून राज्यभरात मोर्चे, पदयात्रा, लाँगमार्च, जेलभरो आंदोलने, उपोषणे व विविध लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यानंतर राज्य सरकारने न्यायमूर्ती अनंत बडर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमून राज्यभरातून माहिती संकलित केली असून समितीचा अहवालही सरकारकडे सादर झाला आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीपूर्वी म्हणजेच १ ऑगस्ट २०२६ पूर्वी सरकार उपवर्गीकरणाचा निर्णय घेईल, अशी समाजाची अपेक्षा होती. मात्र अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी असून या पार्श्वभूमीवर क्रांतीदिनी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशांतभाऊ सदामते यांनी सांगितले.
मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता सांगली बसस्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, तरुण भारत स्टेडियम रोड, राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौकापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार असून दुपारी २ वाजता स्टेशन चौकात जाहीर सभा होणार आहे.
या आंदोलनात आमदार अमित गोरखे, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीमाई साठे, नातू सचिन साठे, दलित महासंघाचे संस्थापक मच्छिंद्र सकटे, शंकरभाऊ तडाखे, राजेशभाऊ घोडे, पुजाताई देडे, बाजीराव नाईक, युवराज दाखले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सांगली व आसपासच्या जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेला प्रशांतभाऊ सदामते, संदीप ठोंबरे, लेखणीपुत्र कुलदीप देवकुळे, संदीप पाटोळे, नगरसेवक रवी सदामते, दीपक वायदंडे, सुहास ऐवळे, अर्जुन कांबळे, कुमार वायदंडे, अर्जुन सकटे, जितेंद्र हेगडे, अनिल सदामते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी.
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण त्वरित लागू करणे.
मातंग समाजासह सर्व घटकांना समान सामाजिक न्याय, हक्क व प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे.
राज्य सरकारने समितीच्या अहवालावर तातडीने निर्णय जाहीर करावा.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या