पलूस प्रतिनिधी, दि. १ : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांनी वाटेगाव येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
याशिवाय पलूस येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तसेच दुधोंडी आणि अंकलखोप येथेही प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदीपआप्पा कदम म्हणाले, "लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे प्रखर शिल्पकार होते. त्यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाला आवाज दिला. त्यांच्या साहित्यामध्ये सामाजिक समतेचा, न्यायाचा आणि माणुसकीचा संदेश आहे. आजच्या पिढीने अण्णाभाऊंच्या विचारांचे वाचन, चिंतन आणि आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल."
ते पुढे म्हणाले की, "समाजात समानता, बंधुता आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहिताची कामे करण्याची गरज आहे."
या अभिवादन कार्यक्रमास राहुल पाटील,संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, तुकाराम धायगुडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या