सांगली प्रतिनिधी : मराठा सेवा संघ, सांगलीच्या सांस्कृतिक भवनात संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महावितरणचे संचालक अभियंता राजेंद्र पवार तसेच मराठा सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रारंभी संगीतसूर्य केशवराव भोसले यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अश्विनकुमार वागळे होते. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष आर. एस. पवार, कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक अमृतराव सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा शीतल मोरे, प्रणिता पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व समाजबांधव उपस्थित होते.
ज्येष्ठ मार्गदर्शक अमृतराव सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात ‘मराठा सेवा संघाची ओळख’ या विषयावर मार्गदर्शन केले. मराठा सेवा संघाने समाजाच्या विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याची माहिती देत समाजबांधवांनी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
नवनाथ घाडगे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने वैयक्तिक प्रगतीसोबत समाजाच्या प्रगतीसाठीही योगदान देण्याची गरज व्यक्त केली. समाजाच्या उन्नतीसाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना अभियंता राजेंद्र पवार यांनी समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे आवाहन केले. ‘केवळ आपल्या समाजापुरते मर्यादित न राहता इतर समाजघटकांनाही सोबत घेऊन पुढे जाण्याचा विचार केला पाहिजे,’ असे त्यांनी सांगितले. समाजासाठी जे काही करता येईल, ते सातत्याने करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी महावितरणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियंता राहुल घोरपडे यांनी केले, तर ओंकार डुके यांनी आभार मानले.
दरम्यान, मराठा सेवा संघ तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सेवा संघातर्फे करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या