सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागतिक स्तरावर गौरव करत सांगलीच्या सुप्रसिद्ध शाहीर माळी परिवाराने दुबई येथे आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय शिवराज्याभिषेक सोहळ्यात आपल्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शाहीर सम्राट डॉ. देवानंद माळी, महिला शाहीर चंद्रिका (कल्पना) माळी आणि युवा शाहीर गंधर्व पृथ्वीराज माळी यांनी सलग दुसऱ्यांदा दुबईमध्ये शाहीरीचा डफ कडाडवत महाराष्ट्राच्या लोककलेचा झेंडा उंचावला.
छत्रपती साम्राज्य जागतिक मराठी संघाच्या वतीने दुबईतील ग्लेंडल इंटरनॅशनल स्कूल, ईद मेथा येथे चौथ्या आंतरराष्ट्रीय शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि शिवचरित्र जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना आणि दीपप्रज्वलनाने झाली. सुनीता देशमुख, प्रियांका भोसले, शुभांगी पाटील, अमृता शिंदे, नीलम ईगावे, कविता मानके, पल्लवी निगडे आणि इतर कलाकारांनी सादर केलेल्या जिजाऊ वंदनेने उपस्थितांना भारावून टाकले.
यानंतर युवा शाहीर गंधर्व पृथ्वीराज माळी यांनी शिवचरित्रावरील दमदार पोवाडे सादर करत सभागृहात शिवमय वातावरण निर्माण केले. डफावरील ठेका आणि त्यांच्या खड्या आवाजातील सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
त्यानंतर शाहीर सम्राट डॉ. देवानंद माळी यांनी आपल्या प्रभावी आवाजात सादर केलेल्या स्वलिखित "महाराष्ट्राचा मराठी बाणा, शाहीरी डफ आज कडाडला... छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा..." या गीताने संपूर्ण सभागृह शिवभक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघाले. महिला शाहीर चंद्रिका (कल्पना) माळी यांनी बालशिवरायांच्या पराक्रमावर आधारित पोवाडा सादर करून शिवकालीन इतिहास जिवंत केला तसेच तरुण पिढीला प्रेरणादायी संदेश दिला.
शाहीर माळी परिवाराने शाहीरी पोवाडे, शिवगीते आणि पारंपरिक गोंधळ यांसारखे लोककला प्रकार सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. त्यांच्या सादरीकरणाला संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान आदी भागांतून आलेल्या शिवप्रेमी आणि मराठी रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
शिवचरित्राचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत रायगड शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शाहीर माळी परिवाराचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात तालवाद्याची साथ राजेंद्र घोलप आणि निलेश मोहिते यांनी दिली. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अभिजित देशमुख, विक्रम भोसले, संदीप कड, मुकुंदराज पाटील, अमोल दुबे, अभिजित गावे, विशाल जगताप, योगेश राज, पंकज आवटी, रघुनाथ सगळे, सचिन कदम, साईनाथ मांजरेकर, रोहन शिंदे तसेच गणेश भजन मंडळ दुबई आणि जय भवानी मंडळ (सत्यशोधक) दुबईच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध व्यासपीठांवर महाराष्ट्राच्या शाहीरी परंपरेचा प्रचार-प्रसार करणाऱ्या शाहीर माळी परिवाराला सलग दुसऱ्यांदा दुबईमध्ये शाहीरी सादर करण्याचा बहुमान मिळाल्याने सांगली जिल्ह्याच्या शाहीरी परंपरेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या