प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : पोदार इंटरनॅशनल स्कूल, सांगली येथे 'बॉयज वेलनेस क्लब' (BWC) उपक्रमांतर्गत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण व मार्गदर्शक सत्राचे आयोजन करण्यात आले. शाळेचे प्राचार्य जी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या सत्रासाठी उमेद रिहॅबिलिटेशन सेंटरचे संचालक, ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ व व्यसनमुक्ती समुपदेशक डॉ. सनद पवार (MBBS, DPM, MIPS) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या विशेष सत्रामध्ये इयत्ता नववीतील मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. डॉ. पवार यांनी किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पौगंडावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, तणाव व्यवस्थापनाची प्रभावी तंत्रे, मानसिक आरोग्याचे महत्त्व तसेच व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिबंधात्मक काळजी याविषयी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
मार्गदर्शनानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले. डॉ. पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक व सविस्तर उत्तरे दिली. त्यामुळे हे सत्र विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरले.
विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक व सामाजिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे यावेळी शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या