सांगली, दि. ५ जुलै : मराठा समाज, सांगली संस्थेच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय विधवा, विधुर व घटस्फोटितांचा पुनर्विवाह परिचय मेळावा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध जिल्ह्यांतील विवाहेच्छुक वधू-वर, त्यांचे पालक व नातेवाईकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रमुख अतिथी प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. अशोक लेंडवे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय सावंत, सरचिटणीस जयवंत सावंत आणि खजिनदार ॲड. विलासराव हिरूगडे-पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन पाटील यांनी उपस्थित विवाहेच्छुक, पालक व नातेवाईकांचे स्वागत करत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे सदस्य ॲड. उत्तमराव निकम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी डॉ. अशोक लेंडवे यांनी मार्गदर्शन करताना जीवनसाथी निवडताना परस्पर समजूतदारपणा, समान विचार आणि सहकार्याची भावना महत्त्वाची असल्याचे सांगितले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत विधवा, विधुर आणि घटस्फोटितांनी नव्या आयुष्याची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी पुनर्विवाहाचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मेळाव्यात उपस्थित सर्व विवाहेच्छुकांचा परिचय खजिनदार ॲड. विलासराव हिरूगडे-पवार यांनी करून दिला. त्यानंतर ॲड. उत्तमराव निकम यांनी परिचय वाचनाची पुढील प्रक्रिया पार पाडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शशिकांत जाधव यांनी केले, तर उपाध्यक्ष दत्तात्रय सावंत यांनी आभार मानले.
या मेळाव्यास कार्यकारिणी सदस्य विकास मोहिते, ॲड. बाबासाहेब भोसले तसेच जत, आटपाडी, खानापूर, माण, खटाव, कोल्हापूर, इचलकरंजी आदी भागांतील विधवा, विधुर, घटस्फोटित वधू-वर, त्यांचे पालक, नातेवाईक आणि संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत पुनर्विवाहाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या