प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आषाढी एकादशीनिमित्त *समर्थ प्राथमिक विद्यामंदिर* येथे भक्ती आणि संस्कारांचा संगम पाहायला मिळाला. शाळेतील विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात सजून विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झाले होते.
भक्तीदिंडीची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरददादा भोई यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात निघालेल्या दिंडीने पंचक्रोशीचा परिसर विठ्ठल जयघोषाने दुमदुमून गेला.
यावेळी बोलताना संस्थाध्यक्ष म्हणाले, _"वारी ही आपली सांस्कृतिक ओळख आहे. लहानपणापासूनच मुलांमध्ये भक्ती, शिस्त आणि एकतेचे संस्कार रुजवण्यासाठी असा उपक्रम आवश्यक आहे."_
आपल्या मनोगतात मुख्याध्यापिका श्रीमती आशाताई पाटील यांनी पंढरीच्या वारीची महती आणि माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सुंदर अभंग, भक्तीगीते सादर केली. डोक्यावर टोपी, गळ्यात तुळशीमाळ आणि हातात भगवी पताका घेऊन आलेल्या मुलांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर पंढरपूरमय झाला होता.
या भक्ती उत्सवात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शेवटी विठ्ठलाच्या नामस्मरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. लहान वयातच वारीचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थी आनंदी दिसून आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या