सांगली, ता. २७ : चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले व राजस्थानचे राज्यपाल ही पदे भूषवणारे पद्मभूषण डाॅ. वसंतराव दादा पाटील व त्यांच्या १६ सहकाऱ्यांनी सांगलीचा तुरुंग फोडला. तो दिवस म्हणजे २४ जुलै १९४३. या घटनेला ८३ वर्षे पूर्ण झाली. तिच्या स्मृती ज्येष्ठ लेखक, अभ्यासक व सांगली सहकारी साखर कारखान्याचे माजी व्यवस्थापक रामचंद्र लटके यांनी जागवल्या. ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाने आयोजन केले होते. ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. मोहन पाटील, अभियंता वसंतराव पुदाले प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष डॉ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिव विठ्ठल मोहिते यांनी स्वागत केले.
‘जेल फोडो’च्या स्मृती जागवताना लटके म्हणाले, ‘‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांती दिन म्हणजेच ९ ऑगस्ट १९४२. महात्मा गांधींनी ‘करा अथवा मरा’ हा संदेश दिलेला दिवस. हजारो तरुण आत्माहुतीस तयार झाले तो दिवस. जो संदेश परकीय सत्ता नाहीशी करण्यास अखेरचा ठरला तो दिवस. याच दिवशी पद्माळेच्या वसंतदादा आणि त्यांचे मित्र मुंबईहून स्फूर्ती, जिद्द घेऊन भागात आले. तरुणांनी ब्रिटिश सत्तेबरोबर प्राणपणाने झुंज देण्याचं ऐतिहासिक कार्य केलं. वसंतदादा, सहकाऱ्यांना पकडून सांगलीच्या तुरुंगात ठेवलं. युक्ती करून तुरुंगातून बाहेर कसे पडता येईल, याचा विचार दादांसह तुरुंगात असणाऱ्या कैद्यांत सुरू झाला. दादांच्या नियोजनाप्रमाणे तुरुंग फोडून बाहेर पडण्याची योजना आखण्यात आली. २४ जुलै १९४३. बाजारचा दिवस. वेळ दुपारी तीनची. वसंतदादा व दत्ताजीराव पाटील यांनी खोलीतून बाहेर पडल्यानंतर ठरल्याप्रमाणे पहारेकरी पोलिसांवर झडप घालून २२ बंदुका, काडतुसे, दारूगोळा ताब्यात घेतला. वैरण बाजारकडील बाजूने असणाऱ्या खंदकात तटावरून उड्या टाकल्या. हिंदूराव पाटील यांची उडी खडकावर पडल्यामुळे पाय दुखावला. पोलिस गोळीबार करत मागे लागलेले. शनिवारच्या बाजारात दादा व सहकाऱ्यांनी तुरुंग फोडल्याचा गलका उडाला. आयर्विन पुलावरून सांगलीवाडीकडे जाण्यापूर्वी दादांनी बंदुकीतून काही गोळ्या हवेत झाडल्या. वसंतदादा आणि सहकाऱ्यांनी ब्रिटिश सत्तेला हादरा दिला. क्रांतिकारकांना तुरुंगवासाची शिक्षा झाली.’’
उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. भागवत थोरात, प्रतापसिंह कवठेकर, भानुदास मोहिते, सुरेश साळुंखे, प्रकाश पाटील, तसेच ग्रंथपाल, सहायक, वाचक, हितचिंतक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या