सांगली प्रतिनिधी : भक्तीच्या विविध छटा, भावनांचे सुंदर रंग उधळताना लाडक्या पांडुरंगाच्या चरणी संगीतसेवा सादर करुन सांगली व पुण्यातील गुरुकुल संगीत विद्यालयाच्या गायक कलाकारांनी रसिकांना चिंब न्हाऊ घातले.
सांगलीतील संगीताचार्य काणेबुवा फाउंडेशन आणि गणेश मंगल कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी एकादशीनिमित्त 'अभंगरंग' कार्यक्रम रविवारी सांगलीत पार पडला.
प्रारंभी सांगली अर्बन बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गणेश मंगल कार्यालयाचे अध्यक्ष श्रीकृष्ण कुलकर्णी, कार्यवाह मधुकर वझे, खजिनदार विनायक पटवर्धन, गुरुकुल संगीत विद्यालयाचे निवासी गुरु कृष्णा मुखेडकर आदी उपस्थित होते.
पुणे येथील गुरुकुल च्या विद्यार्थिनी अनुष्का साने व शचि ब्रह्मे यांनी सादर केलेल्या जय जय राम कृष्ण हरी या गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सांगलीच्या गुरुकुल विद्यार्थिनी स्पृहा जोशी, अनुष्का दांडेकर, सिद्धांत गोंधळी, कौस्तुभ शिंदे यांनी बहारदार अभंग सादर केले. सांगलीकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत या भक्तीपर्वाचा लाभ घेतला.विवेक पोतदार, (तबला), सारंग कुलकर्णी (हार्मोनियम), सतेज पोतदार (पखवाज) आणि समर्थ शिंगारे (टाळ) यांनी साथसंगत केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निरूपण वीणा वझे यांनी केले भिलवडी येथील गुरुकुलातील विद्यार्थीनी अवनी देसाई आणि आर्या जोशी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या